पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच ओमायक्रॉनचे देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे असून या ठिकाणी पर्यटनासाठी देशभरातून अनेकजण येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यामुळे मनोरंजन स्थळे, उद्याने, प्राणी संग्रहालय, वस्तु संग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ऐतिहासिक वास्तु गड, किल्ले, स्मारके, पर्यटन स्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. या भागात खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले असतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन इत्यादी कोविड नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्या प्रकारची जीवीत हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिबंधित केलेले क्षेत्र
ग्रामीण जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील खालील भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील
१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
२) वरील प्रतिबंधीत केलेल्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
३) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
( हेही वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे बंद! मात्र प्रवाशांची रेल्वेकडून लूट )
४) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
५) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे.
६) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
(७) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे. सिस्टम बाजविणे, गाडीमधील स्पिकर उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे.
८) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे..
सदरचे आदेश पोलीस, शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाहीत. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community