ऐन थंडीच्या कडाक्यात आरेच्या जंगलात वणवा

135

सोमवारी मुंबईत गारठवणारी थंडी असताना सायंकाळी आरेतील न्यूझीलंड वसतिगृहानजीकच्या भागात वणवा लागला. या भागात जानेवारी महिन्यात सलग दुस-यांदा वणवा लागला. त्यामुळे हा वणवा लागला की लावला, असा प्रश्न आरेवासीयांना पडला आहे. दरवेळी एकाच ठिकाणी जानेवारी महिन्यातच वणवा कसा लागतो, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत बळी यांनी विचारला आहे.

अतिक्रमणे त्वरित हटवायला हवीत, आरेप्रेमींची मागणी

या वणव्याला विझवण्यासाठी आरेतील विशीच्या वयोगटातील नऊ तरुणांनी पुढाकार घेतला. सोमवारी सायंकाळी आरेतील पर्यावरण संरक्षणासाठी झटणा-या तरुण गटातील एका सदस्याला युनिट नंबर तेरा जवळील न्यूझीलंड वसतीगृहाजवळ वणवा लागल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच तरुणांनी संबंधित ठिकाण गाठले. वणव्याला विझवण्यासाठी कोयत्याने नजीकची झाडे कापून वणवा एका ठराविक जागेतच मर्यादित ठेवला. ही आग नजीकच्या झाडांवर पसरु दिली नाही. या कामासाठी तब्बल दीड तास लागला. परंतु वणव्यामुळे अडीच किलोमीटरचा परिसर खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याघटनेबाबत पोलिस, वनविभाग आणि आरे दुग्ध व्यवसाय प्रशासनालाही माहिती दिली गेली. वणवा लागलेली जागा ही दुग्ध प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार यांच्या बंगल्याजवळ आहे. गेल्या काही वर्षांपासून युनिट क्रमांक १३ जवळ सातत्याने अतिक्रमणे होत आहे, ही अतिक्रमणे त्वरित हटवायला हवीत, अशी मागणी आरेप्रेमींनी केली आहे. यासंबंधी आरे दुग्ध प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

( हेही वाचा : सलग दुस-या दिवशी नाशकात राज्यातील नीच्चांकी तापमान! बोच-या थंडीला हलका ब्रेक )

रविवारीच झाली होती आरेप्रेमी आणि दुग्ध प्रशासनाची बैठक

आरेत वाढत्या अतिक्रमणावर तसेच वृक्षांच्या कत्तलींबाबत आरेतील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते आणि दुग्ध प्रशासनाची बैठक झाली होती. आरेतील वाढते सिमेंटीकरण, झाडांवर लावलेले वायर्स, घनकचरा व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीतील समस्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक उपाय योजले जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.