मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर माऊली मंदिर भक्तांसाठी राहणार बंद!

134

मकर संक्रातीनिमित्त आळंदीत माऊलींना ओवसा वाहण्यासाठी राज्यभरातून महिला येत असतात. या दिवशी मंदिर परिसर, इंद्रायणी घाट तसेच आळंदी शहरात प्रचंड गर्दी होत असते. राज्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोरोनासह ओमायक्राॅनचा संसर्ग राज्यभर फैलावत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे शासनाबरोबरच आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत मंदिर संस्थानाने मकर संक्रांतीच्या दिवशी समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिर विश्वस्तांची माहिती 

मकर संक्रांतीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरूवार, १३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजतापासून ते शनिवार, १५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हे मंदिर बंद असेल, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.

( हेही वाचा : रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर… )

ऑनलाईन दर्शन

या कालावधीत फक्त श्रींचे नित्याचे उपचार आणि परंपरेने होणारे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात संपन्न होतील. या काळात भाविकांना यूट्यूब आणि संस्थानच्या फेसबुकवरून थेट दर्शन घेता येईल. तरी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला संस्थानाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.