केंद्र सरकारने कोविडच्या ‘सेल्फ टेस्ट किट’ च्या वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोविड चाचणी घरी करुन आपल्याला कोरोना झालाय की नाही याचं निदान करु शकतो. त्यामुळे मुंबईत तीन लाखांच्या आसपास या सेल्फ टेस्ट किटची विक्री झाली. पण, त्यातील केवळ एक लाख लोंकाच्या टेस्टचा अहवाल महापालिकेकडे आहे. उर्वरित दोन लाख लोकांचा डेटा पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आता या दोन लाख लोकांना शोधण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.
दोन लाख नागरिकांचा शोध
हे सेल्फ कोविड टेस्ट किट घेतल्यानंतर त्याचा अहवाल मायलॅब या अॅपवर अपलोड करायचा असतो. पण ज्या तीन लाख नागरिकांनी या किटचा वापर केला, त्यापैकी फक्त एक लाख नागरिकांनी आपला अहवाल मायलॅब या अॅपवर अपलोड केला आहे. त्यामुळे उर्वरित दोन लाख नागरिकांचा शोध महापालिकेला घ्यावा लागणार आहे. आता लवकरच औषध विक्रेत्यांना या किट विक्रीची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: …तर तुमची कोरोना चाचणी केली जाणार नाही! )
महापालिकेचे आवाहन
सेल्फ टेस्ट किटच्या एक लाख अहवालांपैकी आतापर्यंत 3 हजार 149 जण बाधित आढळले आहेत. उर्वरित दोन लाख नागरिकांचा मात्र हिशोब लागलेला नाही. त्यामुळे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असला तरी तो अपलोड करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Join Our WhatsApp Community