राज्यातील दुकानांवरच्या पाट्या या मराठीतून असाव्यात, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यामुळे मराठी मनं सुखावली आहेत. यावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा आहे. पण गेली अनेक वर्षे मराठी पाट्यांची मागणी लाऊन धरणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरुन तोफ डागली आहे.
मराठी पाट्यांसाठी मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी गेली अनेक वर्ष लढा दिला आहे. त्यामुळे त्यांचे श्रेय लाटण्याचा कुणीही प्रयत्न करु नये, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. समाजमाध्यमांवर एक पत्रक प्रसिद्ध करुन त्यांनी याबाबत भाष्य केले आहे.
(हेही वाचाः अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार!)
महाराष्ट्र सैनिकांनी शिक्षा भोगल्या
महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी आंदोलन करावं लागूच नये. पण २००८, २००९ साली पाट्या मराठीतंच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडो गुन्हे अंगावर घेतले आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं श्रेय हे फक्त आणि फक्त मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे, ते इतर कुणीही लाटण्याचा आचरटपणा करू नये, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1481525385343172614?s=20
नीट अंमलबजावणी करा
महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन करतानाच राज ठाकरे यांनी या निर्णयाबाबत राज्य सरकारचेही अभिनंदन केले आहे. त्यासोबतच सरकारने आता कच न खाता या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असा सल्लाही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
(हेही वाचाः “महाराष्ट्रात राहायचंय हे विसरू नका”; मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राऊतांचा इशारा)
पुन्हा आठवण करायला लाऊ नका
मराठी शिवाय इतरही भाषा फलकांवर चालतील अशी एक भानगड राज्य सरकारने या निर्णयात करुन ठेवली आहे. याची गरज काय? महाराष्ट्राची भाषा देवनागरी मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. त्यामुळे इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लाऊ नका, असेही राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
मनसेचे काय होते आंदोलन?
मराठी ही राज्य भाषा असल्याने राज्यात दुकानांवर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका जाहीर सभेत घेतली होती. त्यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले होते, त्यांनी दुकानदारांना पाट्या बदलण्यासाठी अल्टिमेटम दिले होते. अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दुकानदारांना दिला होता. त्या अल्टिमेटमनंतर मुंबईसह पुणे, नाशिक येथे मनसे कार्यकर्त्यांनी काही दुकानांची तोडफोड केली, त्यावेळी मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.