मुंबई गुन्हे शाखेने अँटॉप हिल येथून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून या तिघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला १६ किलो १०० ग्राम ड्रग्सची किंमत १६ कोटी १० लाख रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
१६ किलो १०० ग्राम ‘मेथॅक्युलाॅन’ हा अमली पदार्थ जप्त
इम्रान इकबाल जलोरी (४०), अमजद हमीद खान (४२) आणि असिफ अली मोहम्मद अरब (४०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून तिघेही अँटॉप हिल परिसरात राहतात. अँटॉप हिल येथील एसएमडी रोड, कल्पक इस्टेट या ठिकाणी काही इसम ‘मेथॅक्युलाॅन’ हे अमली पदार्थ (ड्रग्स) विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष १ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने बुधवारी रात्री सदर ठिकाणी सापळा रचून सुमारे १६ किलो १०० ग्राम ‘मेथॅक्युलाॅन’ हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘मेथॅक्युलाॅन’ हा ड्रग्स सर्वात महागडा ड्रग्स असून याची विक्री पार्टीत, पबमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे ड्रग्स कुठे जाणार होते व याची खरेदी करण्यासाठी कोण येणार होते याचा तपास सुरु आहे.
(हेही वाचा तिकीट देता देता..कंडक्टरचा असाही मार्केटिंगचा फंडा…)
Join Our WhatsApp Community