दुकानांवरील मराठी पाटय़ा सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाटय़ांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. दरम्यान आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा असा सल्ला राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा
दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्यासंबंधी संजय राऊत म्हणाले की, “कोणी काय सल्ला दिला आहे, यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आंदोलन सुरु आहे. आमची स्थानिय लोकाधिकार समिती, अन्य संघटना आजही या प्रकारचं काम करतात. अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत, पण जाताना तोच विचार घेऊन बाहेर गेले आहेत. कोण काय बोलतं यावर महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही”. तर मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी कधी आम्ही तडजोड करणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहे.
मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या सरळ करू
दरम्यान व्यापार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचे त्यांचे मत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार यांनी गुरूवारीही आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापारांना इशाराच दिला आहे. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या सरळ करू असे त्यांनी म्हटले आहे. विरोध करत असतील तर त्यांना सरळ विरोध करू द्या. विरोध करतो म्हणजे काय… राज्याने हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा –जगातील ‘हे’ 15 देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सज्ज! …पण भारताने पुढाकार घ्यावा)
तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. प्रत्येक राज्याचा, त्या त्या भाषेचा तो अधिकार आहे. त्यामुळे विरोध कसला करताय? तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचंय हे विसरू नका. तुम्हाला इथेच राहून व्यापार करायचा आहे. उद्योगधंदा करायचा आहे. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही म्हणजे काय… त्यांना ते करावंच लागेल. कारण हा कोणताही राजकीय निर्णय किंवा राजकीय भांडण नाहीये, असे म्हणत संजय राऊत यांनी मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या दुकानदार व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना खडेबोल सुनावले आहे.
Join Our WhatsApp Community