दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याचा निर्णय राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयाची लढाई सुरु आहे. या निर्णयानंतर बोरिवलीतील गुजराती नावाची पाटी हटवून मराठीत लावली गेली. याचे श्रेयही आता शिवसेना व मनसे पक्ष घेत आहेत. परंतु ही श्रेयाची लढाई सुरु असतानाच शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्येच इंग्रजी भाषेतील पाट्या तेवढ्याच दिमाखात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. परंतु या दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत लावाव्यात, अशाप्रकारची भीती येथील दुकानदारांना वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जर इंग्रजीतील नामफलक दुकानांवर झळकणार असतील, तर अन्य विभागांमधील दुकानांचे नामफलक मराठी भाषेत होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अत्यंत छोट्या आकारात दुकानदार लिहितात मराठीतून नाव
मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून लावण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या दुकाने व आस्थापनांमध्ये प्रादेषिक भाषेत नामफलक असावेत अशा प्रकारचा उल्लेख असताना महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागामार्फत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे मराठी भाषेऐवजी इंग्रजी व अन्य भाषेतून दुकानांचे नामफलक झळकू लागले. पुढे अधिनियमातील तरतुदींची आठवण करून दिल्यानंतर आणि मनसे स्टाईलने आंदोलन पेटवल्यानंतर नामफलकावरील मराठी भाषेतील नावाचा उल्लेख किती आकारात असावा, असे स्पष्ट नसल्याने दुकानदार सोयीनुसार नामफलकाच्या पाटीवरील एका कोपऱ्यात अत्यंत छोट्या आकारात मराठीतून नाव लिहून आपली सुटका करून घेत आहेत. त्यामुळे यासाठी अधिनियमांमध्ये स्पष्ट उल्लेख होणे आवश्यक होते. सन २०२१ मध्ये डि विभागात अशाच प्रकारे इंग्रजी भाषेतील पाटीवर कारवाई करण्यासाठी प्रकाश मिसाळ नावाच्या व्यक्तीने तक्रार केली होती. परंतु ही कारवाई न झाल्याने त्यांनी सहायक आयुक्तांच्या जनता दरबारामध्ये ही तक्रार मांडली. त्यावेळी सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी अशा प्रकारे कायदा मोडणाऱ्या तथा कायद्याचे पालन न करणाऱ्या दुकान व आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी अधिनियमांमध्ये योग्य ते बदल कशाप्रकारे करता येतील, हे बघण्यात यावे आणि अधिनियमात बदल झाल्यास याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकते अशा प्रकारचे दुकाने व आस्थापनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना ३१ मार्च २०२१ मध्ये पाठवले होते.
(हेही वाचा ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई, नेत्यांसमोर कार्यकर्त्यांची हमरीतुमरी)
विरोधाचे राजकारण
त्यामुळे दुकानांच्या पाट्या मराठीत न लावणाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अधिनियमांमध्ये बदल केले असले, तरी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या वतीने अद्यापही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोशिएनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दुकानांवर मराठीत नाव मोठ्या आकारात लिहायचे की छोट्या आकारात लिहायचे हे आम्ही ठरवू, असे सांगत बंडाचा झेंडा फडकवला. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी मारत नावाच्या पाट्या बदलण्याचा खर्च अधिक की दुकानांच्या काचा याचा विचारा करावा, असे सांगत त्यांना गर्भाीत इशाराच दिला.
दादरमध्ये मात्र मराठीला आव्हान
याच पार्श्चभूमीवर शुक्रवारी बोरीवली एका दुकानावरील गुजरातील भाषेतील नावाची पाटी उतरवून मराठी भाषेतील पाटी लावली आहे. या मराठीतील पाटी लावण्यात आल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. दोन्ही पक्षाकडून याचे श्रेय घेतले जात आहे. परंतु याच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर भागात तर इंग्रजी भाषेतील फलक आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बोरीवलीमध्ये ज्याप्रकारे दुकानदारांनी स्वत: पुढाकार घेत नावाच्या पाट्या बदलल्या, त्याप्रमाणे दादरमधील एकाही दुकानदारांना या पाट्या बदलाव्या, असे वाटले नाही. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही हिंमत दुकानदारांची होत आहे. दादरमधील एन.सी. केळकर मार्ग आणि एच.के. बोले मार्गाच्या जंक्शनला असलेल्या डि.पी हॉटेल, ग्रीन पॅनेल, यश आर्यन फ्रेम इंटेरियर्स आदी दुकानांची नावे पूर्णपणे इंग्रजी भाषेत असून एकीकडे आजुबाजूच्या विभागातील दुकानदार इंग्रजीसह इतर भाषेतील पाट्या काढून मराठीतून लावायला लागले, तिथे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इंग्रजीतील पाट्याच आता शिवसेनेला आव्हान देत आहेत की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
Join Our WhatsApp Community