मुंबई महापालिकेच्या विकासकामांची माहिती समाजमाध्यमांवर देण्यासाठी सर्व विभागीय कार्यालय आणि प्रमुख खात्यांच्या ट्विटर हँडलच्या हाताळणीसाठी नेमलेल्या संस्थेची टिवटिवाट सुरू होण्यापूर्वीच बोलती बंद झाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या संस्थेची नेमणूक करण्यात येत असतानाच या संस्थेने आपण या कामासाठी तयार नसल्याचे कळवले आहे. आर्थिक स्थितीचे कारण देत या कंपनीने या कामातून माघार घेतली असून यामुळे महापालिकेला आता दुसऱ्या संस्थेचा शोध घेण्याची वेळ आली. त्यामुळे सव्वा कोटीतही टिव टिव करायला कुणी तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
संजित कम्युनिकेशन्स प्रा. लि. कंपनी पात्र ठरली, मात्र…
यापूर्वी आपत्कालिन व्यवस्थापन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ट्विटर खात्यांचा कारभार आता जनसंपर्क विभागाच्या अखत्यारित आणला गेला आहे. त्यामुळे सर्व कार्यरत असलेली ट्विटर खाती हाताळणे तसेच इतर प्रकारच्या सुविधांची जबाबदारी निश्चित करत जनसंपर्क विभागाने यासाठी निविदा मागवली होती. यामध्ये पात्र कंपनीची निवड निश्चित करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्याकरिता समाजमाध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन, अंमलबजावणी सहाय्य याकरिता यंत्रणेची नियुक्ती करणे या कामासाठी एक वर्ष कंत्राट कालावधीकरिता संजित कम्युनिकेशन्स प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी विविध करांसह १ कोटी २९ लाख रुपये खर्च होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरु झालेली असतानाच या कंपनीने आपण हे काम करण्यास राजी नसल्याचे संबंधित विभागाला कळवले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिकेचे सोशल मिडियाचे काम करण्याच्या कामाला खिळ बसण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा महापालिका ‘त्या’ डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करणार)
याबाबत जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोशल मिडियासाठी नेमलेल्या कंपनीने काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया राबवली जात आहे, असे सांगितले.
२०१९ पासून महापालिकेचे ट्वीटर खाते सर्व विभागासाठी खुले
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत सन २०१३ पासून ट्विटर खाते निर्माण केले होते. मान्सुन कालावधीत या ट्विटर खात्याचा उपयोग भरती-ओहोटीच्या वेळा, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त हवामान अंदाज, नागरिकांकरिता काही महत्वाचे संदेश असल्यास त्याची माहिती या ट्विटर खात्यावर दैनंदिन आपत्कालीन व्यवस्थापन विभागावर प्रदर्शित करत असे. परंतु मे २०१९ मध्ये तत्कालिन महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे ट्विटर खाते त्या विभागापुरते मर्यादीत न ठेवता मुंबईतील सर्व खात्यांमार्फत केल्या जाणा-या उपाययोजना व विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून ट्वीटर खात्याचा वापर करण्यात यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व विभागीय कार्यालये आणि खात्यांची ट्विटर खाती तयार करुन कार्यान्वित करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community