बिबट्याच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चौथ्या बिबट्याच्या गळ्याभोवती शुक्रवारी रेडिओ कॉलरिंग करण्यात आले. गेल्या दोन मवर्षांत रेडिओ कॉलरिंग केलेली क्रांती नावाची मादी बिबट्या ही चौथी आहे. क्रांती ही पाच वर्षांची मादी बिबट्या नॅशनल पार्कच्या ठाणे भागातील मानपाड्यात राहते. या चारही बिबट्यांना रेडिओ कॉलरिंग केल्यानंतर महिन्याअखेपर्यंत अजून दोन बिबट्यांच्या गळ्याभोवतीही रेडिओ कॉलरिंग केले जाईल, अशी उद्यान प्रशासनाची योजना आहे.
२०२० मध्ये बिबट्याला रेडिओ कॉलरिंग करण्यात आले
जंगलात राहणा-या मुक्त बिबट्यांचा स्वभाव, संचारमार्ग, मानवी वस्तीजवळील वास्तव्य, बिबटे रेल्वे किंवा रस्ता पार करून प्रवास कसा करतात, याबाबतची माहिती घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेडिओ कॉलरिंगचा प्रकल्प हाती घेण्यात आला. २०२० मध्ये उद्यानातील नर आणि मादी बिबट्याला रेडिओ कॉलरिंग करण्यात आले. नर बिबट्याला महाराजा, तर मादी बिबट्याला सावित्री असे नाव दिले गेले. त्यानंतर नुकतेच नोव्हेंबर महिन्यात आरेतून पकडण्यात आलेल्या सी ३३ या मादी बिबट्याला रेडिओ कॉलरिंग केले गेले. महाराजा, सावित्री आणि सी ३३ या तिन्ही बिबट्यांच्या मुक्त संचाराबाबतीतील माहिती रेडिओ कॉलरिंगच्या मदतीने संजय गांधी उद्यान प्रशासन तसेच वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया ही पर्यावरणप्रेमी संस्था घेत आहे.
(हेही वाचा नंदुरबार येथील बिबट्याची पिल्लं झालीत मुंबईकर)
रेडिओ कॉलरिंगचा उर्वरित टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. सहा बिबट्यांना रेडिओ कॉलरिंग झाल्यानंतर काही महिने त्यांच्यावर निगराणी ठेवली जाईल. संपूर्ण अहवाल एकत्रित केल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या राहणीमानाबाबत अधिकृतरित्या तपशीलवार सांगितले जाईल.
– जी. मल्लिकार्जून, वनसंरक्षक आणि संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
काय करत आहेत रेडिओ कॉलरिंग झालेले तीन बिबटे?
लॉकडाऊन अगोदर महाराजा या नर बिबट्याला तर सावित्री या मादी बिबट्याचे रेडिओ कॉलरिंग केले गेले. महाराजा नागला ते तुंगारेश्वरमध्ये सातत्याने ये-जा करत आहे. हा त्याचा रोजचा मार्ग आहे. तर सावित्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, फिल्मसिटी आणि आरेत येजा करत आहे.
रेडिओ कॉलरिंगसाठी बिबट्यांची निवड कशी केली जाते?
बिबट्यांच्या रेडिओ कॉलरिंग प्रकल्पाचा मुख्य हेतू हा बिबट्यांचा स्वभाव त्यांच्या राहणीमानाचा मागोवा घेणे आहे. याबाबत अधिक माहिती देताना बिबट्याचा अभ्यास करणारे व वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाचे साहाय्यक संशोधक निकीत सुर्वे सांगतात की, बिबट्याचा स्वभाव जाणून घेणे हा प्रमुख हेतू रेडिओ कॉलरिंगमधून जाणण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक बिबट्याच्या संचारमार्गाची माहिती घेणे, बिबट्या मानवी वस्तीत येताना काय करतो, मानवी सहजीवनाशी बिबट्याचे नाते, रस्ता किंवा रेल्वे ओलांडून येणारे बिबटे यांची नेमकी माहिती रेडिओ कॉलरिंगच्या प्रकल्पात घेतली जाते. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाच्या बिबट्यांची निवड करतो, असेही सुर्वे म्हणाले.
(हेही वाचा पुण्याचा बिबट्या झाला अंबरनाथकर)
प्रकल्पाचा खर्च
सहा रेडिओ कॉलरसाठी एकूण तीस लाख खर्च झाला असून, हा खर्च वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी, रिलायन्स फाऊंडेशन तसेच अन्य दोन संस्थांच्या मदतीने उचलण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वाइल्डलाइफ एसओएस या पर्यावरणप्रेमी संस्थेचीही मदत झाली आहे.
Join Our WhatsApp Community