मुंबई सागरी किनारा रस्ता, चेंबूर अमर महलचा भूमिगत जलबोगदा आणि त्यापाठोपाठ अवघ्या आठ दिवसांमध्ये आणखी एका भूमिगत बोगद्याचे यशस्वी काम पूर्णत्वास येत आहे.
वांद्रे आणि खार परिसरातील मलजल वाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्र ते जयभारत उदंचन केंद्र या सुमारे १.८५७ किलोमीटर अंतराच्या भूमिगत मलजल बोगद्याचे आव्हानात्मक खनन महानगरपालिकेने अवघ्या तेरा महिन्यांमध्ये पूर्ण केले आहे. हा भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा मलजल बोगदा असून त्यासाठी ‘अर्थ प्रेशर बॅलन्स टीबीएम’ या बोगदा खनन तंत्रज्ञानाचाही प्रथमच उपयोग करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनान केला आहे.
( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ दोन भागात पालिका उभारले वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प! )
वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्र ते जयभारत उदंचन केंद्र या भूमिगत मलजल बोगद्याचे खनन ४ डिसेंबर २०२० रोजी वांद्रे केंद्रापासून सुरु करण्यात आले होते. हे काम सोमवारी १७ जानेवारी २०२२ म्हणजे तेरा महिन्यांनी पूर्णत्वास आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
लहान बोगद्यासाठी अर्थ प्रेशर बॅलन्स हे तंत्रज्ञान
मुंबई मलनिःसारण प्रकल्प अंतर्गत हा बोगदा बांधण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) या खात्याच्या वतीने हे बांधकाम करण्यात येत आहे. कोविड संसर्ग कालावधीतील टाळेबंदीचा कोणताही परिणाम न होऊ देता प्रशासनाने या मलजल बोगद्याचे काम अखंडपणे सुरु ठेवले आहे. सदर मलजल बोगद्याची लांबी १,८५७ मीटर असून त्यांचा अंतर्गत व्यास २.६० मीटर व बहिर्गमी व्यास ३.२० मीटर आहे. भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा बोगदा आहे. याप्रकारच्या मलजल बोगद्यासाठी भारतात प्रथमच अर्थ प्रेशर बॅलन्स हे तंत्रज्ञान वापरात आणले गेले आहे. जिथे मृदू, ओलसर जमीन असताना वेगाने मात्र तितक्याच सुरक्षित पद्धतीने खनन व बांधकाम करावयाचे असते, तिथे या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो.
( हेही वाचा : विद्यमान नगरसेवक सोशल मिडियावर का करून देत आहेत वारसदारांची ओळख? )
सन २०५१ पर्यंतचा विचार करता, भविष्यकालीन सुमारे ७२ दशलक्ष लीटर इतक्या क्षमतेने मलजल वाहून नेण्याची क्षमता समोर ठेवून या प्रकल्पाचे आरेखन, संरचना करण्यात आले आहे. या बोगद्याचे बांधकाम सेंगमेंटल लाईनिंग पद्धतीने करण्यात येत आहे. भविष्यात चिंबई उदंचन केंद्राकडे येणारा मलजल प्रवाह हा या प्रस्तावित मलजल बोगद्यामध्ये घेण्यासाठी माहिम कॉजवे जंक्शन (मदर व सन गार्डन स्टॅच्यू) येथे शाफ्ट देखील बांधले जात आहे.
मलजल प्रवाह वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्रापर्यंत पोहोचणार
या बोगद्याद्वारे मलजल प्रवाह हा उताराच्या दिशेने (गुरुत्वाकर्षणाने) वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. या संपूर्ण १.८५७ किलोमीटर बोगद्याचे काम करताना मध्ये कुठलीही खोदविहीर (शाफ्ट) न घेता, बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) द्वारे जलदगतीने करण्यात आले आहे. उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, मुंबई मलनिःसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता अतुल राव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सहायक अभियंता राजेश पाटील, दुय्यम अभियंता राहूल अहिरे आणि प्रणाली धामणस्कर व सहकारी कर्मचारी, कामगार या प्रकल्पामध्ये योगदान आहे.
Join Our WhatsApp Community