पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस गावठाणमध्ये रात्री 11 च्या सुमारास धुडगूस घातला आहे. 15 ते 20 जणांच्या टोळीने 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्यानं तोडतोड केली आहे. रात्री उशिरा तरुणांनी हैदोस करत परिसरात दहशत निर्माण केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. याप्रकरणी 15 ते 20 जणांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
असा घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस परिसरात दोन गटात वाद झाल्यानंतर, तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते आणि अन्य हत्यारे घेत परिसरात दहशत माजवली आहे. आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या फोडत नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
(हेही वाचा – गोरेगावमधील खेळण्यांच्या दुकानात BIS चा छापा!)
रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही तरुण हातात प्राणघातक हत्यारे घेऊन धावताना दिसत आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयितांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Join Our WhatsApp Community