मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने आणखी दोन यांत्रिकी झाडूची खरेदी केली जाणार आहे. केंद्र सरकारच्यावतीने पर्यावरण, वने व हवामान परिवर्तन मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून यापूर्वी पाच यांत्रिकी झाडूची खरेदी करण्यात आली आहे. त्यातूनही याअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून काही निधी शिल्लक राहिल्याने आता त्यातून आणखी दोन यांत्रिक मशीनची खरेदी केली जात असून, महापालिकेच्या ताफ्यातील आता यांत्रिकी झाडूची संख्या २४ एवढी होणार आहे.
प्रदुषकांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट
दिवसेंदिवस ढासळत असणाऱ्या हवेच्या गुणवत्तेची दखल राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने घेतली असून प्रदुषणाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान परिवर्तन मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचा पंच वार्षिक कार्यक्रम सुरु केला आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत हवेतील पीएम १० व पीएम २.५ या प्रदुषकांचे प्रमाणे २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यता आला आहे. त्याअंतर्गत मुंबई महापालिकेला यांत्रिकी झाडू वाहने खरेदी व एक वर्षांची देखभाल आदींसाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
( हेही वाचा : राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव… )
दोन यांत्रिक झाडूंची खरेदी
या निधीतील पहिला ४.७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून त्यानुसार पाच यांत्रिक झाडुची खरेदी करण्यात आली आहे. ही पाच यांत्रिक झाडू ऑक्टोबर २०२१ मध्ये महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. तर या निधीतील १.२९ कोटींचा निधी शिल्लक असून त्यातून आणखी दोन यांत्रिक झाडू महापालिकेच्यावतीने खरेदी केली जात आहेत. त्यानुसार या दोन यांत्रिक झाडूंची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी दोन वर्षांच्या देखभालीसह दोन यांत्रिक झाडूंसाठी १ कोटी ६४ लाख ४ हजार ५६० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी राम इंजिनिअरींग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली आहे.
- पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर : ५ यांत्रिक झाडू
- वांद्रे कुर्ला संकुल : २ यांत्रिकी झाडू
- सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड, पूर्व मुक्त मार्ग : ३ यांत्रिक झाडू
- शहर भाग : ४ यांत्रिक झाडू
- पूर्व उपनगरे : ४ यांत्रिक झाडू
- पश्चिम उपनगरे : ४ यांत्रिक झाडू