आदिवासी विकास विभागाच्यावतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी.पाडवी यांनी आदिवासी समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच क्रीडा धोरण ठरवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून हॉकी खेळाडू व माजी सनदी अधिकारी जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आदिवासी खेळाडूंना आता मुंडा पुरस्कार देण्यात येणार आहे.
अनिल वसावेला आर्थिक सहाय्य
या कार्यक्रमास आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त महेंद्र वारभुवन आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील अनिल वसावे हा तरुण १८ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जाणार आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ या कालावधीत दक्षिण अमेरिकेतील सर्वांत उंच माऊंट एकांकगुआ हे शिखर सर करण्यासाठी जाणार आहे. या दोन्ही उपक्रमांसाठी अनिल वसावे याला मिशन शौर्यअंतर्गत आदिवासी विभागाच्यावतीने आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. अनिल याला आदिवासी विकास विभागाच्या वतीने मंत्री पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या.
( हेही वाचा: आयएनएस रणवीरमध्ये स्फोट! ३ जवान हुतात्मा )
आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन
अनिल हा जगातील सर्वांत उंच शिखरे सर करून महाराष्ट्राचे व देशाचे नावलौकिक जगात मिळवेल. त्याच्या या ध्येयाला आदिवासी विभागाने पाठबळ द्यायचा निर्णय घेतला, असल्याचे पाडवी यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या धोरणात लवकरच काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरण ठरवण्यात येणार असून, आदिवासी युवक आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पुढे कसे जातील यावर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community