ब्रिक्स एसटीआय म्हणजेच ‘ब्रिक्स’देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेषी संकल्पना विषयी सुकाणू समितीची 15 वी बैठक नुकतीच झाली. यामध्ये वर्ष 2022 मध्ये आयोजित करावयाच्या कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. ब्रिक्स एसटीआय सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये ब्रिक्स राष्ट्रांची विज्ञान मंत्रालये आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्यावतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातले प्रमुख आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रमुख आणि सल्लागार संजीवकुमार वार्ष्णेय यांनी बैठकीचे नेतृत्व केले. यंदाच्या वर्षात भारत विविध पाच कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. यामध्ये ब्रिक्स स्टार्टअप्स मंचाची बैठक घेणार आहे. तसेच ऊर्जा कार्यगटांच्या बैठका घेणार आहे. तसेच जैवतंत्रज्ञान आणि जैवऔषधे, आयसीटी आणि उच्च कार्यक्षमता; एसटीआयईपी (विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेषी संकल्पना आणि उद्योजकता भागीदारी ) कार्यगटाची बैठक आयोजित करणार आहे. त्याचबरोबर ब्रिक्स नवोन्मेषी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत ठरणारे ज्ञान केंद्र सुरू करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली.
जाणून घ्या यंदाची संकल्पना
ब्रिक्सच्या एसटीआयच्या वर्षभरातल्या कार्यक्रमांविषयी आणि हे सर्व कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे, प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा झाली. भारताने जानेवारी 2022 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद चीनकडे सुपूर्द केले आहे. ‘‘जागतिक विकासासाठी नवीन युगामध्ये उच्च गुणवत्तेसह ब्रिक्सची भागीदारी’’ अशी ब्रिक्स 2022 ची संकल्पना आहे. या संपूर्ण वर्षामध्ये मंत्रीस्तरावर आणि ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रमुखांच्या शिखर परिषदा होणार असून अनेक क्षेत्रीय कार्यक्रम आणि बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पाच कार्यक्रम भारत करणार
डिजिटल माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये चीन च्यावतीने संपूर्ण वर्षभर चालविण्यात येणा-या विविध उपक्रमांविषयी विस्तृत रूपरेषा सादर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांची माहिती देण्यात आली. ब्रिक्स युवा संशोधक परिषद, वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री स्तरीय बैठका यांच्याविषयी माहिती देण्यात आली. वर्षभरामध्ये एकूण 25 कार्यक्रमांच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पाच कार्यक्रम भारत करणार आहे. ब्रिक्स स्टार्टअप्स आघाडी आणि नवोन्मेषी ज्ञान केंद्र यांच्या निर्मितीसाठी मुख्य कार्यकारी संस्था म्हणून डीपीआयआयटी कार्य करणार आहे. ब्रिक्स युवा संशोधक परिषदेचे सप्टेंबर 2022 मध्ये आभासी स्वरूपामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. कार्बनच्या अति उत्सर्जनाचे निष्प्रभावीकरण करणे, जैवऔषधे, कृत्रिम बुद्धिमत्ता, मटेरियल सायन्स, आधुनिक शेती अशा विविध विषयांवर आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमांविषयी या बैठकीत चर्चा झाली.
(हेही वाचा – US Airport 5G: एअर इंडियासह अनेक फ्लाईट्स आज रद्द, काय आहे नेमकं कारण)
या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचा हेतू
सप्टेंबर 2022 मध्ये ब्रिक्स विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीस्तरीय 10 वी बैठक आणि वरिष्ठ अधिका-यांची बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव चीनने ठेवला आहे. मुक्त, समावेशक आणि सामायिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी संकल्पनांना प्रोत्साहन देणे अशी या बैठकीची संकल्पना असेल. मंत्रीस्तरीय बैठकीबरोबरच ब्रिक्सच्या ‘फ्रेमवर्क कार्यक्रमाअंतर्गत (2015 -2022) राबविण्यात आलेल्या यशस्वी प्रकल्पांच्या परिणामांची माहिती देणा-या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येईल. या बैठकीमध्ये वैज्ञानिक कार्यक्रम आणि त्यांच्या वार्षिक वेळापत्रकाला अंतिम स्वरूप देण्यावरही चर्चा झाली. या महिनाखेरपर्यंत सर्व देश आपल्या नियोजित कार्यक्रमांच्या विशिष्ट तारखा आणि त्यांचे स्थान तसेच संबंधित बैठकीचे स्वरूप याविषयी माहिती सादर करणार असल्याबाबत सर्वांनी सहमती व्यक्त केली. भारताने 23-24 मार्च 2022 रोजी एसटीआयईपी कार्यसमूहाची बैठक घेण्याविषयी आणि मे/ जून 2022 मध्ये ब्रिक्स स्टार्टअप्स मंचाची बैठक आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.