भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वत: 2022 हे वर्ष तिच्या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष असल्याचे सांगितले आहे. शरीर थकत आहे, तसेच प्रत्येक दिवशी असणा-या दबावासाठी तिच्यात ऊर्जा आणि प्रेरणा आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. त्यामुळे आपण निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचं सानिया मिर्झाने सांगितलं आहे. वयाच्या 6 व्या वर्षापासून खेळत असलेली, सानिया मिर्झा आता निवृत्त होणार असून, तिने स्वतःच्या बळावर जगातील नंबर 1 टेनिसपटू म्हणून ओळख निर्माण केली आहे.
सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू
सानियाने (35 वर्षे) तीन मिश्र दुहेरी ट्रॉफीसह सहा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहेत. तिची जोडीदार नादिया किचेनोक हिच्यासह ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर, तिने निवृत्तीची घोषणा केली. सानियाला स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
निवृत्त होण्याचे कारण
सानियाने करिअरमधील सर्वोत्तम 27व्या रँकिंगसह सिंगल्समध्ये अव्वल 30 मध्ये प्रवेश केला. मनगटाच्या दुखापतीमुळे, तिने एकेरी सोडून दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, ज्याचे उत्कृष्ट निकाल देखील मिळाले. वयाच्या 35 व्या वर्षी, जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा शरिरात वेदना जाणवतात. अमेरिका ओपन पर्यंत खेळण्याचा माझा प्रयत्न आहे. हेच सध्या माझे धेय्य असल्याचे सानियाने सांगितले.
सानिया मिर्झाची कारकिर्द
- महिला दुहेरीत सानिया पहिल्या क्रमांकावर पोहोचली.
- तिने आपल्या कारकिर्दीत 6 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकले आहेत.
- यापैकी तीन जेतेपद महिला दुहेरी आणि तीन मिश्र दुहेरीत जिंकले.
- सानियाच्या नावावर 2009 ची मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 ची फ्रेंच ओपन आणि 2014 ची यूएस ओपन आहे.
पद्मश्री मिळवणारी सर्वात तरुण महिला खेळाडू
सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईत झाला. तिने वयाच्या 6 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. 1999 मध्ये तिने पहिली आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळली. 2002 मध्ये, सानियाने लिअँडर पेससह मिश्र दुहेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 2004 मध्ये, भारतासाठी टेनिसमधील तिच्या चांगल्या कामगिरीबद्दल तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये सानियाला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री मिळवणारी सानिया ही सर्वात तरुण महिला खेळाडू आहे.
( हेही वाचा: ठाकरे सरकारचा 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा? )
सानिया ही सर्वात हाय-प्रोफाइल ऍथलीट
2003 पासून 2013 मध्ये एकेरीतून निवृत्ती होईपर्यंत, तिला महिला टेनिस संघटनेने भारताची नंबर 1 खेळाडू म्हणून स्थान दिले. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत, तिने स्वत:ला सर्वात यशस्वी भारतीय महिला टेनिसपटू आणि देशातील सर्वाधिक मानधन घेणारी आणि सर्वाधिक उच्च-प्रोफाइल खेळाडूंपैकी एक म्हणून स्थापित केले आहे.
Join Our WhatsApp Community