राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोठडी गुरुवारी संपणार होती. परंतु, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली आहे. अनिल देशमुख हे गेल्या ८० दिवसांपासून ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
१४ दिवसांची वाढ
मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली. मध्यंतरी अनिल देशमुख बरेच दिवस अज्ञातवासात होते. शेवटी ते स्वतःच ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या ८० दिवसांपासून ते कोठडीत आहेत. गेल्या १० जानेवारीला न्यायालयाने देशमुखांच्या कोठडीत १० दिवसांची वाढ केली होती. त्यानुसार गुरुवारी २० जानेवारी रोजी त्यांची कोठडी संपणार होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे.
(हेही वाचा नायलॉन मांजाची सर्रास विक्री! उच्च न्यायालयाने काय दिला आदेश?)
खळबळजनक आरोप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. यानंतर सचिन वाझेवर देखील कारवाई करण्यात आली होती. तसेच देशमुखांच्या खासगी सचिवांना देखील अटक करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community