माहीने थकवले १८०० रुपये

235

सध्या महाराष्ट्रामध्ये काकूंच्या १८०० रुपयांच्या व्हिडिओची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १८०० रुपये थकवल्याची चर्चा सुरु झाली आहे. झारखंडचा सर्वाधिक करदाता असणाऱ्या धोनीने १,८०० रुपयांची थकबाकी केली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या थकबाकीदारांच्या यादीत धोनीचे नाव आले आहे. ज्या स्टेडियममध्ये धोनीच्या नावाने पॅव्हेलियन आहे, त्याच क्रिकेट असोसिएशनमध्ये धोनीची थकबाकी आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनमध्ये धोनी आजीवन सदस्य आहे.

झारखंड क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वेबीनारच्या माध्यमातून झाली. या सभेत २०१९-२० या वार्षिक रिपोर्ट देण्यात आला. या रिपोर्टमध्ये धोनीचे नाव ५९व्या क्रमांकावर आहे. धोनीच्या नावावर ३१ मार्च २०२० पर्यंतची थकबाकीची रक्कम दाखवण्यात आली आहे.

काहीतरी त्रुटी आल्यामुळे धोनीचे नाव या यादीमध्ये आले असेल, अशी प्रतिक्रिया धोनीचे पहिले प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिली. धोनीचे नाव खराब करण्यासाठी तर अशा गोष्टी केल्या जात नाही ना? असा सवालही बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

याप्रकरणी असोसिएशनचे सचिव संजय सहाय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २७ डिसेंबर २०१९ ला असोसिएशनच्या कमिटी ऑफ मॅनेजमेंटने धोनीला आजीवन सदस्य बनवले होते. त्यावेळच्या नियमानुसार धोनीने सदस्यत्वासाठीचं शुल्क म्हणून १० हजार रुपयांचा चेक जमा केला होता. पण संवादाच्या अभावामुळे जीएसटीची रक्कम जमा करण्यात आली नव्हती. ही थकबाकी धोनीच्या नावाने जो चेक देण्यात आला आहे, त्यातूनच भरली जाऊ शकते, त्यामुळे यावरुन वाद निर्माण करणे योग्य नाही, असे असोसिएशनचे सचिव संजय सहाय म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.