मुंबईत अमली पदार्थ विकणा-यांनी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. पोलिसांना आपला माग लागू नये, यासाठी ग्राहकानांच ड्रग्ज विकायला सांगितले जात आहे. ग्राहकांची एक साखळी तयार करुन ते अमली पदार्थ विकत असल्याचे, उघड झाले आहे. ज्यांना स्वत:साठी अमली पदार्थ हवा आहे, अशा ग्राहकांचाच यासाठी वापर केला जात आहे. पोलिसांना या पॅटर्नची खबर लागताच, त्यांनी या पॅटर्नची गंभीर दखल घेतली आहे.
असा उघड झाला प्रकार
डोंगरी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच एमडी ड्रग्जसोबत काही आरोपींना पकडले होते. तेव्हा ते अशा प्रकारे अमली पदार्थ विकून स्वत:साठी सोय करुन ठेवत असल्याचं, पोलीस तपासात उघड झालं होतं. काही ग्राहक स्वत:ला अमली पदार्थ हवे म्हणून, तर कधी पैशासाठी ड्रग्ज विकायला तयार होतात किंवा एखाद्या दिवसासाठी लागणारे अमली पदार्थ काढून बाकीचे पैशांसाठी विकतात, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे आयुक्त दत्त नलावडे यांनी दिली.
( हेही वाचा: शासन निर्णयाला आठ दिवस उलटले, तरी दुकानांवरील इंग्रजाळलेल्या पाट्या तशाच! )
असा राबवला जातोय नवा पॅटर्न
ड्रग्ज पेडलर्सच्या या नव्या पॅटर्नबद्दल पोलिसांनी सांगितले की, अमली पदार्थ विकून दिल्यास संबंधित ग्राहकाला काही माल मोफत दिला जातो. एखाद्या ग्राहकाला पाच ग्रॅम कोकेन हवे असेल, तर त्याला 20 ग्रॅम दिले जाते. त्यातले 15 ग्रॅम कोकेन त्याला विकायला सांगितले जाते. त्याने ते विकले, तर त्याला आणखी 5 ग्रॅम कोकेन मोफत दिले जाते. ही नवीन पद्धत सध्या त्यांच्याकडून सर्रास वापरली जात आहे. मोफत अमली पदार्थ मिळत असल्याने, ग्राहकही ते विकून द्यायला तयार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community