ओमायक्रॉन या कोविड-19 च्या नवीन व्हेरीएंटच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र दि.10 जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागात आत्तापर्यंत 68 हजार 828 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. सर्वात जास्त ठाणे जिल्हयातील 43 हजार 658 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
युध्दपातळीवर बूस्टर डोस देण्याचे काम सुरू
कोकण विभागात सद्या लसीकरण वेगाने सुरु आहे. सर्व नागरिकांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. दक्षिण अफ्रिकेत उदयास आलेल्या ओमायक्रॉन या कोविड-19 च्या नव्या व्हेरिएंटचा प्रादूर्भाव सर्वत्र झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्हयातील सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना युध्दपातळीवर बूस्टर डोस देण्याचे काम चालू आहे. ठाणे जिल्हयात 43 हजार 658, रायगड जिल्हयात 9 हजार 884, रत्नागिरी जिल्हयात 6 हजार 419 तर पालघर जिल्हयात 8 हजार 867 असे कोकण विभागात एकूण 68 हजार 828 नागरिकांनी आत्तापर्यंत बूस्टर डोस घेतला आहे.
(हेही वाचा -धक्कादायक! प्रतिमा खराब होऊ नये, म्हणून लपवले जातायत कोरोना मृतांचे आकडे )
या नागरिकांनाच बूस्टर डोस
आरोग्य कर्मचारी, कोविड योध्दे, 60 वर्षावरील नागरिक यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले असतील व दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण केले असतील, त्यांनाच तिसरा डोस देण्यात येत आहे. 60 वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देतांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लसीकरण केले जात आहे.