वैद्यकीय शिक्षण संशोधन संचलानलायाशी संलग्न सरकारी रुग्णालयांत कोरोनाच्या मूलभूत उपचारांसाठी आवश्यक असलेल्या तीन प्रमुख औषधांचा साठा संपला आहे. त्यापैकी पॅरासिटामॉल ही सर्वसामान्य उपचारांसाठी राखीव ठेवलेल्या सरकारी रुग्णालयांतही आता उपलब्ध नसल्याने पॅरासिटामॉलची गोळी रुग्णांचे नातेवाईक क्लिनिकमधून खरेदी करून आपल्या रुग्ण नातेवाईकासाठी उपलब्ध करुन देत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पॅरासिटामॉलची गोळी कोणत्याही सरकारी रुग्णालयांत उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली.
तीन महिन्यांपासून औषधांच्या तुटवड्याची समस्या गंभीर
गेल्या तीन महिन्यांपासून औषधांच्या तुटवड्याची समस्या गंभीर स्वरुप घेत आहे. शरीरात कणकण किंवा अंगदुखीची समस्या उद्भवल्यास पॅरासिटामॉलची गोळी दिली जाते. त्यामुळे कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसली की तातडीने पहिल्यांदा पॅरासिटामॉलची गोळी रुग्णांना डॉक्टरांकडून दिली जात आहे. त्याखालोखाल एझिथ्रोमायसिन आणि डॉक्सिसायक्लिन या गोळ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी दिल्या जातात. सध्या या दोन औषधांच्या तुटवड्यामुळे शेजारील सरकारी रुग्णालयांकडून उपलब्ध साठा मिळवत दिवस ढकलला जात आहे.
(हेही वाचा – जगातील ‘या’ १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकून मोदी पुन्हा सर्वात लोकप्रिय नेते)
कोणताच पुरवठादार हाफकिनशी संपर्क ठेऊ इच्छित नाही
तिन्ही औषधांसाठी सध्या सर्वच सरकारी रुग्णालयांनी हाफकिन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाकडे तगादा लावला आहे. परंतु दोन्ही संस्थांकडून एकमेकांवर चालढकल सुरु असल्याने रुग्णसेवा कोलमडत आहे. औषधांच्या नव्या दरवाढीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयाने प्रलंबित ठेवल्याने बाजारातील दरात औषधसाठा करणे शक्य नसल्याची माहिती हाफकिनकडून औषध पुरवठादारांना दिली गेली. अगोदरची रक्कम दिलेली नसल्याने या मागणीबाबतही कोणताच औषध पुरवठादार हाफकिनशी संपर्क ठेऊ इच्छित नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community