साता-यातील किरपे गावातील शेतक-याच्या पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. अचानक शेतातून आलेल्या बिबट्याने आपल्या लहानग्याच्या मानेला पकडून शेतात नेत असल्याचे पाहताच वडिलांनीच बिबट्याशी दोन हात केले आणि आपल्या मुलाचे प्राण वाचवले. गेल्या तीन महिन्यांत बिबट्याचा कराड परिसरात दुसरा हल्ला आहे. याआधी १५ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी कामगाराच्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. बिबट्यांच्या सातारा परिसरातील ऊस तोडणी क्षेत्रातील वावर वाढत असल्याने बिबट्यांची या परिसरात गणना करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
राज धनकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला
कराड येथील किरपे गावात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. धनंजय देवकर यांच्या शिवारातच शेतीचे काम संपले होते. शेतीचे अवजारे आणि साहित्य पिशवीत भरुन ठेवतानाच त्यांच्या पाच वर्षांच्या राज धनकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला. पिशवीत अवजार भरत असताना खाली जमिनीवर पडलेले अवजार उचलण्यासाठी खाली वाकला असताना बिबट्याने त्याच्या मानेला पकडून शेताकडे पळू लागला. त्याचक्षणी धनंजय यांनी मुलाचे पाय पकडून बिबट्याच्या तोंडातून त्याला सोडायचा प्रयत्न केला. शेतालगत असलेल्या तारेच्या कुंपणात बिबट्या धडकल्याने त्याला मुलाला पुढे ओढता आले नाही. मुलाला तिथेच सोडून बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात राजच्या मानेला मोठी जखम झाली. मात्र त्वरित उपचार सुरु झाल्याने त्याच्या जीवाला कोणताच धोका नसल्याची माहिती दिली गेली.
(हेही वाचा येऊरमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह)
दोन्ही हल्ल्यात एकच बिबट्या?
१५ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर गुरुवारी संबंधित हल्ल्याच्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या किरपे गावात बिबट्याने पुन्हा लहान मुलावर हल्ला केला. जेरबंद केलेला बिबट्या हा हल्लेखोर नसून, भलताच बिबट्या पकडल्याची चर्चा आहे.
सह्याद्री परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय
सह्याद्री व्याघ्र परिसरात बिबट्यांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. परंतु बिबटे पिल्लांना जन्माला घालण्यासाठी व्याघ्र परिसरानजीकच्या ऊसक्षेत्रात घर करत आहेत. पाणी तसेच भक्ष्यही सहज उपलब्ध होत असल्याने बिबट्यांचा ऊसक्षेत्रात वावर आता संघर्षाचे रुप घेत असल्याची माहिती साता-याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली. कराड, पाटण भागांत बिबट्यांच्या संख्यांची गणनाही व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
वन्यजीवांच्या उपचारांचे ट्रान्सिट केंद्राची उभारणी त्वरित हवी
सातारा तसेच सह्याद्री परिसरातील वन्यजीवांचा वावर लक्षात घेता वन्यजीव उपचार ट्रान्झिट सेंटर मंजूर झाले आहे. या केंद्राची उभारणी त्वरित करण्याची मागणी भाटे यांनी केली. यामुळे संघर्षकाळात तातडीने वनविभागाचे बचाव पथकही उपलब्ध होईल, असे भाटे म्हणाले.
बिबट्याच्या क्षेत्रात वावरताना…
- बिबट्याला माणूस भक्ष्य म्हणून आवडत नाही. डोळ्यांना समांतर दिसणा-या बक-या, रानटी मांजर, कोल्हे हे सातारा, पाटण भागांत वावरणा-या बिबट्याचे आवडते भक्ष्य आहे. कित्येकदा माणसाचे लहान मूल भक्ष्य म्हणून पकडल्याचे लक्षात येताच बिबट्या लहान मुलाला सोडून पलायन करतो. परंतु लहान मुले खाल्ल्याचे आतापर्यंत दिसून आलेले नाही. त्यामुळे लहान मुलांना बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात घेऊन जाऊ नका.
- एकटा प्रवास करु नका. माणसांच्या घोळक्यात जाताना मोठमोठ्याने आवाज करा किंवा मोबाईलवर गाणे लावा.
- रात्रीचा प्रवास टाळा. प्रवास करायचा असल्यास हातात टॉर्च आणि काठी असू द्या.
- कचरा व्यवस्थापन योग्य असू द्या. गायी, म्हशी, बक-यांना घराच्या खुल्या परिसरात ठेऊ नका.