अखेर उत्पल पर्रीकर अपक्ष निवडणूक लढवणार…

145

गोव्यातील निवडणुकीच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांची उमेदवारी हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपाने अनेक पर्याय दिले तरी उत्पल पर्रीकर यांनी ते अमान्य करत पणजी येथून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

माझे राजकीय करिअर पणजीच्या लोकांच्या हाती

‘आपण हा निर्णय घेऊन फार कठीण मार्ग निवडला आहे. आपल्या करियरवर खूप जणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असेही उत्पल पर्रीकर म्हणाले. गेल्या वेळीही मला संधी नाकारली आहे. आताही नाकारली आहे. इथल्या लोकांना माहीत आहे. हा मनोहर पर्रिकराच्या पार्टीतील निर्णय वाटत नाही. कधी तरी जनतेसाठी थांबावे लागते. मी अपक्ष लढतोय. माझे राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवले आहे, असे उत्पल म्हणाले. मी कोणत्याही पद आणि मंत्रीपदासाठी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे. हे युद्ध कठीण आहे. मला काही तरी मला मिळेल यासाठी मी काही करत नाही. पणजीचे लोक 30 वर्ष माझ्या लोकांसोबत होते. येथील वर्ग उच्च शिक्षित आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे. माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही’, अशी खंतही यावेळी उत्पल यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा ‘हे’ 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यासाठी मुभा…)

पंतप्रधानांनी उत्पलचे मन वळवण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्पल पर्रीकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण उत्पल हे पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम. दोन दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे राज्यात पडसाद उमटले होते. 12 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून उत्पल यांना उमेदवारी दिली पाहिजे, असे म्हणणे पूर्णपणे चूक असल्याचे म्हटले. पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.