कोरोनाचा वाढता प्रभाव आणि ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांत मुलं सतत ऑनलाईन शिक्षण घेत होते. घरीच अभ्यास असल्याने, मुलांच्या शाळेत जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत खंड पडला आहे. त्यामुळे मुलं शाळेत आल्या आल्या त्यांच्यामागे अभ्यासाचा तसेच परीक्षांचा ससेमिरा लावू नका, त्यांना शाळेत रुळू द्या, असे मत शिक्षण तसेच बालरोगतज्ज्ञ यांनी व्यक्त केले आहे.
तरच शैक्षणिक नुकसान भरुन निघेल
शिक्षण विभागाने शाळांना अभ्यासक्रम, परीक्षांचे वेळापत्रक, शाळांची वेळ, पुढील शैक्षणिक वर्षाचा आराखडा यातून सूट देण्याचे निर्देश द्यायला हवेत, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे तसेच बालरोगतज्ज्ञांचेही आहे. शाळा सुरु होताना विद्यार्थी वावरणा-या परिसराची स्वच्छता, काळजी यात शाळा आणि पालकांनी हलगर्जीपणा करणे योग्य नाही. हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांवर लगेचच परीक्षांचे ओझे किंवा अभ्सासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान समोर न ठेवता त्यांचे भावनिक व शैक्षणिक समुपदेशन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बुद्धी,मन आणि शरीर यांच्यात समन्वय साधून त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणले, तरच त्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन निघू शकते.
( हेही वाचा: बेरोजगारीची मोठी समस्या! भारतातील ‘इतके’कोटी तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत )
पालक आणि शिक्षक यांचे उद्धिष्ट
कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील किंवा काहींनी तर स्व:तशी निगडित अनेक समस्यांचा सामना केलेला असू शकतो, त्यामुळे त्यांना त्या जगातून बाहेर आणून पुन्हा शिक्षणाच्या दुनियेत रममाण करणे हे शिक्षक आणि पालकांचे प्रथम उद्धिष्ट असायला हवे. यासाठी शिक्षक आणि पालक दोघांना प्रचंड मेहनत आणि संयमाची आवश्यकता असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांचे आहे.