राज्यात कोरोना परिस्थिती रुग्ण पटकन डिस्चार्ज होत असल्याने नियंत्रणात येत असली तरीही कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली. आगामी आठवडा पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत कोरोना वाढीचा असल्याचा अंदाज डॉ व्यास यांनी व्यक्त केला आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईतून कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली. ही लाट आता मुंबई खालोखाल जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत सरकलेली आहे. त्यामुळे पुणे आणि ठाण्यात आता कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी दिली. मुंबईत निश्चितच रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.
मात्र पुणे, नागपूर आणि नाशिक भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल अशी माहितीही डॉ आवटे यांनी दिली. कोणत्याही लाटेची सुरुवात राज्याच्या सर्वच भागांत एकदम नाही होत, ती हळूहळू वेगवेगळ्या परिसरात पसरते. तिसरी लाट ही ओमायक्रोनची असल्याचे जवळपास सिद्ध झाले असले तरीही या लाटेत रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका नाही, असेही डॉ आवटे म्हणाले.
(हेही वाचा – शाळा सुरू करण्यापूर्वी मंत्री वर्षा गायकवाडांनी काय केल्या सूचना? वाचा…)
दरम्यान, शुक्रवारच्या नोंदीत पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. पुण्यात 78 हजार 884, त्याखालोखाल ठाण्यात 46 हजार 945, नागपूरात 18 हजार 679 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
- शुक्रवारी राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची नोंद – 48, 270
- राज्यातील सक्रीय रुग्णांची नोंद -2,64,388
- शुक्रवारी डिस्चार्ज झालेले रुग्ण – 42,391
- आतापर्यंतची डिस्चार्ज संख्या – 70,09,823