राष्ट्रध्वजाचा अवमान कराल तर याद राखा, कारवाई होणार!

154

राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, तसेच जर कोणी जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही  सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान होतो

दरवर्षी प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.

( हेही वाचा: लगेच अभ्यास नको, आधी मुलांना शाळेत रुळू द्या! )

तर कारवाई केली जाईल

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. कार्यक्रमानंतर असे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज संबंधिताकडून इतस्तत: टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. या अनुषंगाने सर्व आस्थापनांना आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी जनतेनेदेखील आवश्यक काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.