अजून किती निष्पाप मृत्यू मुंबई महापालिकेला हवेत, दरेकरांचा सवाल

119

ताडदेव आगीच्या दुर्घटनेला सर्वस्वी मुंबई महापालिका जबाबदार आहे. आगीत अनेक निष्पापांचे नाहक जीव गेले, त्यामुळे आता असे किती निष्पाप मृत्यू महापालिकेला हवे आहेत. सोसायटी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे ? तसेच महपालिका, पोलिस, अग्निशमन दल, बेस्ट या यंत्रणांशी समन्वय साधणारी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले. तसेच आजची दुर्घटना व गेल्या काहि महिन्यांतील आगीच्या दुर्घटनांची माहिती घेऊन आगामी विधीमंडळ अधिवेशनात यासाठी जबाबदार असलेली मुंबई महापालिका व राज्य सरकार यांचा पर्दाफाश करण्याचा इशाराही प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाशेजारील कमला बिल्डिंग येथे आग लागलेल्या ठिकाणी भेट दिली व तेथील रहिवाश्यांना धीर दिला. तसेच आगीच्या दुर्घटनेतील जखमींची भाटिया रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचनाही दरेकर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्या. त्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, कमला बिल्डींगमध्ये आग नेमकी कुठे व कशामुळे लागली यासंदर्भात उपस्थित पोलिस अधिकारी, पालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. एक-दोन दिवसात यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्यात येईल. परंतु आजची आगीची घटना व मुंबईत गेल्या काही महिन्यात घडलेल्या आगीच्या घटना पाहता ही बाब अतिशय गंभीर आहे. आगीच्या या दुर्घटनांमुळे निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे.

(हेही वाचा – मुंबईत आगीच्या घटनेत वाढ! अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष, माहिती देण्यास टाळाटाळ)

मुंबई महापालिकेने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्याकडे योग्य स्वरुपात फायर अर्लामिंग सिस्टिम नाही. फायर ब्रिगेडने ही दक्षता घेणे गरजेचे आहे. एखादा अपघात घडल्यांनतर अशा दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचे प्राण जाणार असेल व यानंतर आम्ही येऊन भेट देऊन पाहणी करून काय उपयोग ? कारण तोपर्यंत गेलेले जीव आम्ही परत आणू शकत नाही, याकडे आता तरी मुंबई महापालिका प्रशासन व राज्य सरकार यांनी तातडीने गांर्भीयाने पाहण्याची गरज असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तसेच उपनगरातही लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगीच्या दुर्घटना रोखण्याच्या दृष्टीने परिणामकारक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी करतानाच दरेकर यांनी सांगितले की, आजची आगीची दुर्घटना तसेच मुंबईत वारंवार घडणा-या आगींच्या घटनांसंदर्भात विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवाज उठविणार असून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणीही अधिवेशनात करण्यात येईल. दर महिन्याला आगीच्या दुर्घटनांमुळे बळी जात असतील तर या निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या संबंधितांविरुध्द कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

सकाळी आग लागल्यानंतर जखमी रहिवाश्यांना उपचारासाठी काही रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. हे जर असे घडले असेल तर ते फार गंभीर आहे. रुग्णालयांच्या संवेदनाच गेल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार जर जाणिवपूर्वक घडले असतील तर विरोधी पक्ष नात्याने याविषयाचा जाब विचारला जाईल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख जाहीर केले म्हणजे महापालिका प्रशासन व राज्य सरकार यांची जबाबदरी संपत नाही. तर अश्या दुर्घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, महापौरांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर येथे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही दुर्घटना कोणामुळे घडली, यासाठी कोण जबाबदार आहे. यावर भाष्य करणे अपेक्षित आहे. महापालिकेने झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.