माझगावमधील हँकॉक पूलाची पाहणी करण्याची आदित्य ठाकरेंना सपाची विनंती

162

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला कोणतेच स्थान दिले जात नसल्याने आता समाजवादी पक्षानेही सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे काम सुरु केले आहे. माझगाव येथील हँकॉक पुलाचे काम मागील सहा वर्षापासून रखडलेले असून यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे समाजवादी पक्षाने आता शिवसेनेच्या नेत्यांचे या पुलाच्या कामाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या पुलाची पाहणी करण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भायखळा येथे उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रम स्थळापासून अवघ्या ५००मीटरच्या अंतरावर असलेल्या हँकॉक पूलाच्या कामाची पाहणी केली जावी असे पत्र समाजवादी पक्षाचे नगरसेवक व महापालिका गटनेते,आमदार रईस शेख यांनी आदित्य ठाकरे यांना पाठवले आहे.

अद्याप या पुलाचे बांधकाम नाही

मुंबई महापालिकेचे समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात हँकॉक पुलाचे बांधकाम हे ५० कोटींवरून ८६ कोटी रुपयांवर पोहोचले तरीही अद्याप या पुलाचे बांधकाम झालेले नाही. माझगाव ते नूरबाग डोंगरी या महत्वपूर्ण दोन भागांना जोडणारा रेल्वेच्या अखत्यारीत येणारा हॅकाँक पूल जूना झाल्याने पुनर्बाधणीचे काम महानगरपालिकेमार्फत सुरू झाले. या भागात ये-जा करण्यासाठी नागरिकांना अन्य कोणताही रस्ता उपलब्ध नाही. परिणामी शाळा, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, दुकानदार, तसेच नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माझगावकरांचे जीवन कसरतीचे झाले आहे,असे या पत्रात म्हटले आहे.

पूलाच्या कामासाठी ११ कोटी रूपयांची वाढ

पुलाची पुर्नबांधणी महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे व हलगर्जीपणामुळे सदर पूलाच्या बांधकामास सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. पुलाच्या कामासाठी सन २०१६ या वर्षी ५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या कामासाठी २५ कोटी रूपये खर्च वाढला आहे. महानगरपालिकेमार्फत सांगण्यात आले, उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत हँकॉक पूलाच्या कामासाठी ११ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. पूलाच्या कामासाठी एकूण ८६ कोटी रुपये महापालिकेमार्फत खर्च होणार आहे. परंतु महापालिकेमार्फत सदर हँकॉक पूलाचे काम कधी पूर्ण होणार हेच समजत नाही, असे म्हटले आहे.

(हेही वाचा – दक्षिण मुंबईतील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे रविवारी अनावरण)

काय म्हटले पत्रात

रविवारी २३ जानेवारी, २०२२ रविवार रोजी ‘ई’ विभागातील महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास आपली विशेष उपस्थिती आहे. या कार्यक्रम स्थळापासून अवध्या ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या हँकॉक पूलाच्या कामाच्या दिरंगाईबद्दल आपण पाहणी करून माझगावकर नागरिकांशी याबाबत संवाद साधावा, असेही रईस शेख यांनी या पत्रात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.