महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऐतिहासिक पहिले महाअधिवेशन २३ जानेवारी २०२० रोजी नेस्को मैदान, गोरेगाव येथे भरले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महाराष्ट्र सैनिक या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित होते. ‘उद्याच्या- भविष्याच्या महाराष्ट्रासाठी’ एक एक करत विविध विषयांबाबतचे ठराव मांडले जात होते. अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात पक्षाचे सर्व नेते व्यासपीठावर आले आणि बाळा नांदगावकर यांनी उपस्थित सर्वांच्या साक्षीने ठराव मांडला “सन्माननीय अमित राज ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करत आहोत…” नांदगावकर यांनी उच्चारलेले हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी एकच जल्लोष केला. टाळ्यांचा महाप्रचंड कडकडाट झाला. मनसेच्या नेते पदावर राहून अमित ठाकरे यांनी मागील २ वर्षभरात विविध सामाजिक विषयांना न्याय मिळवून दिला. त्यांनी केलेल्या झंझावती आंदोलनाचा मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी थोडक्यात आढावा घेतला.
नवीन फळी तयार होतेय
अमित ठाकरे राजकारणात यायला हवेत, त्यांनी पक्षाच्या कारभारात महत्वाची भूमिका बजावायला हवी, नेतृत्व करायला हवे, ही हजारो महाराष्ट्र सैनिकांची मनोकामना ‘त्या’ एका ठरावाने पूर्ण झाली. टाळ्यांचा कडकडाट आणि जयजयकाराच्या घोषणांतून हजारो महाराष्ट्र सैनिकांनी अमित ठाकरेंच्या नेतेपदाचा ठराव संमत केला! त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या ताऱ्याचा उदय झाला. लवकरच आपल्या कार्य-कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या समाजमनात, सह्याद्रीच्या काळजात तो स्वतःची वेगळी जागा निर्माण करणार होता. समोरच्याचे ऐकून घेण्याचा स्वभाव आणि कोणत्याही विषयाच्या सर्व बाजू समजून घेण्याचा आग्रह, या अमित ठाकरे यांच्या स्वभावामुळे सर्वसामान्य जनता आणि पक्षाचे लहान-मोठे पदाधिकारी यांच्यात त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. विशेष म्हणजे, मनसेत एक नवीन फळी त्यांच्यासोबत मोठी होताना दिसू लागली आहे.
(हेही वाचा अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार!)
मागील २ वर्षांची धडधडीची कारकीर्द
गेल्या दोन वर्षांत या युवा नेतृत्वाने निवासी डॉक्टर्स, बंधपत्रित डॉक्टर्स, आशा स्वयंसेविका, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक, एमपीएससी विद्यार्थी, शालेय विद्यार्थी व पालक, टोल कामगार, ई-कॉमर्स कामगार आदी विविध समाजघटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्न तर केलाच, पण त्याच बरोबर खड्डयांचा प्रश्न, नोकरभरती- स्पर्धापरीक्षा पध्दती, शासन आदेशात मराठीचा आग्रह यांबाबत ठाम मते मांडली. त्यांच्या आवाहनामुळे गेल्याच महिन्यात ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, आरोग्य सेविकांपासून ई-कॉमर्स कामगारांपर्यंत अनेकांच्या समस्यांना, प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. नोकरभरती, रस्त्यांवर पडणारे खड्डे, अस्वच्छ समुद्र किनारे आदी विषयांवर मार्मिक-परखड मते व्यक्त करून अमित ठाकरे यांनी त्यांच्या भावी राजकारणाची दिशा दाखवून दिली.
Join Our WhatsApp Community