पुणे अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) १ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान पुण्यात विकल्या गेलेल्या होम टेस्टिंग, रॅपिड अँटीजेन चाचणीच्या (RAT) दोन लाखांहून अधिक किट्सची नोंद असली तरी, ऑनलाइन विकल्या गेलेल्या किट्सची कोणतीही नोंद पुणे महानगरपालिकेकडे नाही.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कोणतीही तपासणी नाही
अन्न व औषध प्रशासनाने मेडिकल स्टोअर्सना होम टेस्टिंग किटच्या खरेदीच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश दिले होते. केमिस्ट/मेडिकल स्टोअर्सवर निर्बंध लागू केले तरीही यासंदर्भात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कोणतीही तपासणी केली जात नाही. असे, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट (सीएपीडी) चे अध्यक्ष सुशील शाह यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : अन्यथा बसमधून खाली उतरा…PMPML महामंडळाचा मोठा निर्णय! )
आम्ही औषधविक्रेत्यांना होम टेस्टिंग किट्सची विक्री करताना, ग्राहकांचे फोन नंबर तसेच माहितीची नोंद करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरुन आवश्यक असल्यास ही माहिती पालिकेला देता येईल, परंतु या किट्सची विक्री करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कोणतीही नोंद केली जात नाही असे शहा यांनी स्पष्ट केले. केमिस्टच्या संस्थेने यापूर्वीही औषधांची विक्री करणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तपासण्याची गरज असल्याचे पालिका अधिकाऱ्यांना कळवले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मचीही दखल घेतली पाहिजे. घरगुती चाचणीसाठी किती किट्स ऑनलाइन खरेदी केल्या गेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांनी पालिकेशी संपर्क साधला की नाही याची कोणतीही नोंद नाही. असेही त्यांनी सांगितले.
ICMR पोर्टलवर रेकॉर्ड
अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागाचे सहआयुक्त एस.बी.पाटील यांनी सांगितले की, त्यांना १ जानेवारीपासून पुणे विभागातून दोन लाख किट खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत डेटा किंवा होम टेस्टिंग किट विकत घेतलेल्या लोकांच्या संख्येसाठी संपर्क साधला नाही. ऑनलाइन खरेदी केलेल्या या किट्सचा मागोवा ठेवणे हे एक आव्हान आहे, परंतु ऑनलाइन विक्रेत्यांकडून खरेदीदारांचे संपर्क क्रमांक रेकॉर्ड केले जातात. खरेदीची नोंद नसली तरीही या किट्समध्ये एक यंत्रणा आहे जिथे रुग्णाची माहिती ICMR पोर्टलवर रेकॉर्ड केली जाते असेही सहआयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, त्यांना होम टेस्टिंग किटच्या खरेदीबाबत एफडीए किंवा केमिस्टकडून कोणताही डेटा मिळालेला नाही. ऑनलाइन खरेदी केलेल्या किटसाठी, आम्हाला ICMR कडून डेटा देखील मिळत नाही. त्यामुळे रूग्ण नोंदणीकृत असले तरी आमच्याकडे डेटा नाही आणि आम्ही या रूग्णांपर्यंत फॉलोअपसाठी पोहोचू शकत नाही. असे, डॉ वावरे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community