उद्धव ठाकरे काल जनतेसमोर आले, ते बोलतायत हे पाहूनच विरोधकांचे धाबे दणाणले असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी राऊत म्हणाले, भाजपच्या विरोधात शिवसेनेनं आता महाराष्ट्राच्या बाहेरही लढायचं ठरवलं आहे. आज आम्हाला यश लगेच मिळणार नाही, पण उद्या नक्की मिळेल. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट भाजपलाच आव्हान दिलं आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही त्यांची चिलखतं आहेत. ही चिलखत काढून त्यांनी मैदानात यावं. त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं राऊत म्हणाले.
काय म्हणाले राऊत…
ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ही भाजपची शस्त्रं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिलं. अंगावरती वर्दी असेल पोलिसांच्या तर कुणाच्याही अंगावर जात असतो. बेकायदेशीर कामे करत असतात, आपण सिनेमात अशा प्रकारचे दृश्य पाहत असतो. तशी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही त्यांची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत.
आम्ही युतीचा धर्म कायम पाळला
भाजपला शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये जमीनीपासून आकाशापर्यंत नेल्याचं सांगताना ठरवलं असतं तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमीनीवरुन आकाशापर्यंत पोहचवलं, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही युतीचा धर्म कायम पाळला. इतिहास याला साक्ष आहे. काल उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे, असेही राऊत पुढे म्हणाले.