अरेच्चा…गुन्ह्यातील जप्त केलेला ऐवज पोलिसांनीच लांबवला

134

गुन्ह्यातील जप्त केलेली मालमत्ता पोलिसांनीच लांबवल्याची घटना भांडुप येथे उघडकीस आली आहे. थोडे थोडे करून सुमारे ५ लाखांचा ऐवज दोन पोलिसांनी लांबवला असून याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात महिला कॉन्स्टेबलसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंपणानेच शेत खाल्याचा प्रकार समोर आल्यामुळे पोलिस ठाण्यातील ऐवजही सुरक्षित नसल्याची चर्चा जनसामान्यामध्ये सुरू आहे.

जप्त केलेल्या मालाचा हिशेब लागला नाही…

गुन्ह्यात जप्त केलेली मौल्यवान वस्तू रोकड इत्यादी मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी एक कक्ष प्रत्येक पोलिस ठाण्यात असतो. या कक्षाची जबाबदारी दोन पोलिस अंमलदार यांच्यावर देण्यात आलेली असते. जप्त करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू, रोकड इत्यादी या कक्षात ठेवली जाते. येणाऱ्या आणि कक्षातून जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची नोंद करण्याची जबाबदारी या ठिकाणी कार्यरत पोलिसांवर असते. भांडुप पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले भरत सुर्यवंशी आणि निर्मला लोहारे यांच्यावर पोलिस ठाण्याने जप्त केलेल्या मालमत्तेची जबाबदारी सोपवली होती. या दोघांनी २०१२ ते २०१९ दरम्यान पोलिस ठाण्यात जमा झालेल्या मालमत्तेपैकी ३ लाख २१ हजार रुपयांची रोकड आणि २ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ३१ हजार रुपयांच्या मालमत्तेचा हिशेब जुळून येत नसल्यामुळे सूर्यवंशी यांच्या जागेवर बदली होऊन आलेल्या महिला पोलिस अंमलदार संगीता वाघ यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलिस ठाण्याला हा प्रकार लक्षात आणून दिला.

(हेही वाचा बाळासाहेबांनी सेनेला युतीत सडवले का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

तपास सुरू

२०१२ मध्ये लोहारे यांची बदली झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला होता, त्यानंतर २०१९ मध्ये सूर्यवंशी यांची गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर संगीता वाघ यांनी पदभार स्वीकारला असता हा प्रकार वाघ यांनी उघडकीस आणला. याप्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू असताना लोहारे आणि सूर्यवंशी हे दोषी आढळून आल्यामुळे भांडुप पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.