मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये ८९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे!

137

कोविड – १९ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. या ८ व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने मुंबईतील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबईबाहेरील होते. मुंबईतील २८० नमुन्यांपैकी ८९% अर्थात २४८ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. ८% अर्थात २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उपप्रकाराने; तर उर्वरित सुमारे ३% अर्थात ११ नमुने हे इतर उपप्रकारांचे असल्याचे आढळून आले आहे. या ११ नमुन्यांपैकी २ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

( हेही वाचा : अबॅकस उपक्रमाच्या शिवसेनेच्या मागणीला केराची टोपली )

पालिकेचे आवाहन

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत आठव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.

( हेही वाचा : प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन : टपाल विभागाच्या चित्ररथावर होणार महिला सशक्तीकरणाचे दर्शन )

दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड – १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन काकाणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

अशाप्रकारे निघाला निष्कर्ष

  • २८० चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
  • ८ व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २८० रुग्णांपैकी ३४% अर्थात ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत.
  • या खालोखाल २८% म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत.
  • २५% म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत.
  • ८% म्हणजेच २२ रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील; तर ५% म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.
  • चाचण्या करण्यात आलेल्या २८० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १३ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, २ नमुने ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ४ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ७ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
  • कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २८० पैकी ७ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
  • लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली, तर १५ रुग्णांना अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.
  • एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि ५ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.