दादरच्या आशिष इंडस्ट्रीज येथील कचरा वर्गीकरण करण्याची जागा एका संस्थेला देण्यात आलेली असताना ती जागा एका व्यापाऱ्याला भाड्याने देण्यात आल्याने महापौरांनी यावर कारवाईचे आदेश देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने सोमवारी मनसेने याठिकाणी तीव्र आंदोलन केले. ही जागा व्यापाऱ्याला कशी काय देण्यात आली, असा सवाल करत मनसेच्या शिष्टमंडळाने या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी अशी मागणी पालिकेच्या जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
( हेही वाचा : अबॅकस उपक्रमाच्या शिवसेनेच्या मागणीला केराची टोपली )
कारवाई करण्याची मागणी
दादर आशिष इंडस्ट्रीज येथील कचरा वर्गीकरण केंद्राची जागा भाड्याने देण्यात आलेल्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीसाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी जी दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी व्यापारी, सामाजिक संस्था आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले.
( हेही वाचा : मराठी पाट्यांचा ठराव २००८ चा, सेनेला १२ वर्षे पडला होता विसर… )
…तर मनसे स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन करू
महापालिकेच्या वतीने ‘आकांशा’ या बचत गटाला ही जागा दहा वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. मात्र या सामाजिक संस्थेने परस्पर ती जागा एका व्यापाऱ्याला भाडे तत्वावर दिली आहे. त्या व्यापाऱ्याला त्याचे सामान ठेवण्यासाठी ही जागा कशी काय दिली? घनकचरा विभाग काय करत होते, असा आरोप किल्लेदार यांनी केला आहे.
या जागेवर मनसेचे शाखा अध्यक्ष उमेश गावडे, लक्ष्मण पाटील, जयवंत किल्लेदार यांनी मालाचे लोडींग सुरु असतानाचे चित्रीकरण करून ही बाब उघडकीस आणल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते.
( हेही वाचा : मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये ८९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे! )
तरीही संबंधित पालिकेचे घनकचरा अधिकारी व्यापारी आणि सामाजिक संस्था यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई अथवा गुन्हा दाखल करत नाही. त्यामुळे पालिका अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत का, असा सवाल करत पोलीस एफआयआर करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत का, असाही सवाल किल्लेदार यांनी या निवेदनाद्वारे उपस्थित केला. या संबंधित व्यापाऱ्यावर त्वरित कारवाई केली नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन करू असाही इशारा किल्लेदार यांनी दिला.
Join Our WhatsApp Community