जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमानाची होणारी नोंद आता कमाल तापमानाच्या वर्गवारीत गेल्याची ‘कमाल’ सोमवारी झाली. राज्यातील किमान तापमानाखालोखाल महाबळेश्वरमध्ये कमाल तापमानही सर्वात निच्चांकी नोंदवले गेले. महाबळेश्वरसह माथेरानमध्ये कमाल तापमान २० अंश सेल्सिअसवर पोहोचले. राज्यातील बहुतांश भागांतील कमाल तापमान २५ अंशाखाली नोंदवल्याने सोमवारी राज्यात शेकोटी पेटू लागल्या आहेत. मुंबई, डहाणू, अलिबाग आणि मालेगावमध्ये गेल्या दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वात निच्चांकी कमाल तापमान नोंदवले गेले.
( हेही वाचा : मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये ८९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे! )
सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळा गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना कडाक्याच्या थंडीमुळे सकाळीच स्वेटर, कानटोप्यांचा आधार घ्यावा लागला. रस्त्यावर चालणा-या कित्येकांनी हातातही हातमोजे घालणे पसंत केले. आज रस्त्यावरची कटींग चहा गप्पा मारण्याच्या ठिकाणापेक्षाही शरीराला ऊब मिळण्यासाठी गरम चहा देण्याचे कित्येकांचे हक्काचे ठिकाण बनल्याचे दिसून येत होते. महामार्गावरही थंडीच्या वा-यांच्या प्रभावामुळे चाकरमान्यांनी प्रवासादरम्यान शाल आणि मफलरचाच आधार घेतला.
ग्रामीण भागांतही सायंकाळी शेकोटीकडे सर्वांनी गर्दी केली. थंडीत वारेही जोमात वाहू लागल्याने हा आठवडा स्वेटर आणि कानटोप्यांचाच राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवल्याने आरोग्याची काळजी घेण्याचेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन करा
अचानक थंडीचा कडाका वाढल्यास शरीराला वातावरणात कमी झालेल्या तापमानाशी सहज मिसळता येत नाही. परिणामी, या दिवसांत सर्दी, खोकल्याचे तसेच तापाचे रुग्ण वाढतील. दमेकरी रुग्णांनीही पहाटेचा प्रवास टाळावा, असे आवाहन डॉक्टरांच्यावतीने करण्यात आले आहे. दम्याची औषधे सोबत बाळगा, असेही डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.
( हेही वाचा : मुंबईकरांनो… कडाक्याच्या थंडीत बाहेर पडताय? अशी घ्या काळजी )
कमाल तापमानाच्या निच्चांकी नोंदी –
- सोमवारी मुंबईतील सांताक्रूझ येथे नोंदवलेले २४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान तसेच कुलाबा येथील २४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान हे मुंबईतील गेल्या दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमान ठरले.
- नजीकच्या डहाणूतही कमाल तापमान २२.५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गेल्या दहा वर्षांत डहाणूतही जानेवारी महिन्यातील कमाल तापमानातील ही निच्चांकी नोंद ठरली.
- मालेगावातही कमाल तापमान २० अंश सेल्सिअस एवढे खाली सरकल्याने मालेगावातही जानेवारी महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमानाची सोमवारी नोंद झाली.
- अलिबागमध्येही पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एवढा पारा खाली सरकला गेल्याचा नवा रेकॉर्ड झाला.
राज्यातील इतर भागांतील कमाल तापमानाच्या नोंदी – (अंश सेल्सिअसमध्ये)
नाशिक – २३.९ , हरणाई – २३.८, पुणे २५.४, उस्माानबाद – २४, ठाणे – बेलापूर – २०, चिखलदरा – २३.४, जालना – २४.२
Join Our WhatsApp Community