गांजा लपवण्यासाठी बनवली खास कार, पोलिसांनी असा लावला छडा!

186

अमली पदार्थाची विक्री़ करणारे भामटे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी काय काय क्लृप्त्या काढतील सांगता येणार नाही. दोन दिवसांपूर्वीच अमली पदार्थ विकण्यासाठी ग्राहकांनाच विक्रेते बनवत, असल्याचं समोर आलं होतं आणि आता तर गांजा लपवण्यासाठी चक्क खास कार तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

कारमध्ये केले बदल

सध्या अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय वाहतूक पकडण्यात अनेक अडचणी आणि धोके निर्माण झाले आहेत. पोलीस बारकाईने या तस्करीवर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे अशी तस्करी करताना अमली पदार्थ सहजतेने सापडू नयेत, यासाठी तस्करांनी नवीन क्लृप्ती शोधून काढली. गाडीतून तस्करी करताना पोलिसांना अमली पदार्थ सापडू नये, यासाठी कारमध्ये काही बदल करण्यात आले होते.

आरोपींना अटक

ही बदल करुन घेतलेली कार गांजाच्या विक्रीसाठी वापरली जात असल्याची, माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. अमली पदार्थविरोधी पथकाने या कारमधून 115 किलो गांजा जप्त केला, तर दोन आरोपींना अटक केली. इम्रान अबरार हुसैन अन्सारी (42) आणि इस्माईल सलीम शेख (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सापळा रचून केला गांजा जप्त

महाराष्ट्रात ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याची, बातमी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटचे पोलीस निरिक्षक रुपेश नाईक यांना मिळाली होती. त्यानुसार घाटकोपरच्या बस आगार परिसरात सापळा रचण्यात आला, काही वेळातच माहिती मिळालेली कार पोलिसांना दिसली. त्यानंतर कार बाजूला घेऊन तिची तपासणी करण्यात आली, परंतु प्रथमदर्शनी कारमध्ये काहीही आढळून आले नाही. मात्र कारची नीट पाहणी केली असता, गांजा ठेवण्यासाठी कारमध्ये पोकळ्या तयार करण्यात आल्याचे उघड झाले.

( हेही वाचा :माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, कोण सचिन वाझे?)

अशी बनवली खास कार

गाडीच्या मागच्या दरवाजांच्या विंडो ग्लासची खालची बाजू, गाडीचे मागचे सीट, तसेच गाडीच्या टेल लाईटच्या मागे पोकळ्या तयार करुन, गांजाची पाकिटे लपवलेले पोलिसांना आढळून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.