तीस कोटी रुपयांचे कागदोपत्री व्यवहार दाखवून साडेपाच कोटी रुपये जीएसटीचा अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतून एका व्यावसायिकाला जीएसटी विभागाने अटक केली. आरोपी गेल्या साडेतीन वर्षांपासून अपहार करत असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने त्याने साडेपाच कोटी रुपयांचा आयात-निर्यात क्रेडिट अपहार केल्याचा संशय या व्यक्तीवर आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
भिवंडीतून अटक केलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचे नाव मुन्नवर शकुर खान असे असून तो व्यावसायिक आहे. तो भिवंडी येथील बंगलापुरा येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खान हा मे. आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स या कंपनीचा मालक आहे. त्याने कागदोपत्री व्यवहार दाखवून साडेपाच कोटी रुपयांचा जीएसटी अपहार केल्याचा आरोप आहे.
(हेही वाच – सलग दुसऱ्यांदा चित्ररथावरील शिल्पांची निर्मिती करण्याचा मान ‘या’ जिल्ह्याला…)
डिसेंबर २०२१ पासून तपास होता सुरू
श्री श्याम स्टील ट्रेडर्स या अस्तित्त्वात नसलेल्या कंपनीमार्फत भिवंडीतील आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स या कंपनीने बनावट व्यवहार दाखवून आयटीसी घेतल्याची गुप्त माहिती रायगड जीएसटी विभागाकडून भिवंडीतील जीएसटी अधीक्षकांना मिळाली. त्यानुसार याप्रकरणी डिसेंबर २०२१ पासून तपास सुरू होता. त्यात आरोपीने आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स बनावट व्यवहार केल्याचे समोर आले. तपासणीत आरोपीच्या कंपनीने व्यवहार केलेल्या १३ कंपन्या अस्तित्त्वातच नसल्याचे आढळले आहे. त्यांच्याबरोबर सुमारे ३० कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार दाखवले. त्यामार्फत पाच कोटी ५२ लाख रुपयांचा आयटीसी मिळवण्यात आला.