माहिम प्रसूतिगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपणार?

114

मुंबई महापालिकेच्या माहिममधील प्रसुतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली आहे. या प्रसूतिगृहाला अनाथांची माता सिंधुताई सकपाळ आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका दिवंगत इंदुमती माणगावकर यांचे नाव देण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. सिंधुताई सकपाळ यांचे कार्य मोठे आहे त्यामुळे त्यांचे नाव मोठ्या वास्तूला देण्यात यावे असे सांगत शिवसेनेकडून भाजपच्या नगरसेविकेने शिफारस केलेल्या या नावाला विरोध होत आहे. त्यामुळे माहिममधील या प्रसूतीगृहाला कुणाचे नाव दिले जाणार अशी चर्चा सुरु आहे.

( हेही वाचा : …तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो निवडणूक कार्यक्रम! )

माहिम मधील प्रसूतिगृह हे प्रभाग क्रमांक १९० मध्ये येत असून याठिकाणच्या स्थानिक नगरसेविका भाजपच्या शीतल गंभीर आहेत. परंतु या प्रसूतिगृहाला शिवसेनेच्या माजी नगरसेविका इंदुमती माणगावकर यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी आरोग्य समिती अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे. माणगावकर यांनी दहा वर्षे नगरसेविका होत्या आणि हे प्रसूतिगृह अत्याधुनिक व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. साधी राहणी आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या माणगावकर यांचे स्मरण कायम राहावे यासाठी या प्रसूतिगृहाला त्यांचे नाव देण्याची मागणी सरवणकर यांनी केली होती.

( हेही वाचा : अडीच महिन्यांनंतर अखेर मुख्यमंत्र्यांचे होणार प्रत्यक्ष दर्शन! )

राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता

सरवणकर यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी आरोग्य समितीला पत्र दिल्यानंतर भाजपच्या स्थानिक नगरसेविका शीतल गंभीर यांनी १७ जानेवारी २०२२ रोजी आरोग्य समितीला पत्र लिहून या प्रसूतिगृहाचे नामकरण सिंधुताई सकपाळ प्रसूतिगृह करावे अशी मागणी केली आहे. भारतीय समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानितत करण्यात आलेल्या सिंधुताई सकपाळ या अनाथांची माता म्हणून परिचित होत्या. त्यामुळे त्यांचे नाव स्मरणात राहावे म्हणून या प्रसूतिगृहाला सिंधुताईंचे नाव देण्याची मागणी गंभीर यांनी केली आहे. त्यामुळे या दोन्ही नामकरणाच्या मागणीचे प्रस्ताव आरोग्य समितीच्या पटलावर ठेवण्यात आले आहे.

( हेही वाचा : पेंग्विनसाठी करोडो रुपये…हत्ती मात्र दुर्लक्षित! )

त्यामुळे या वास्तूला आता कुणाचे नाव दिले जाणार यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नामकरणावरून शिवसेना आणि भाजप एकमेकांशी लढताना दिसणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.