महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की, महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आतापर्यंत शैक्षणीक, संशोधन व विस्तार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. देश आत्मनिर्भर होण्यासाठी कृषि क्षेत्राचे योगदान महत्वाचे ठरणार आहे.
शेतक-यांच्या विकासावर भर
सर्वांच्या योगदानामुळे विद्यापीठाचे मानांकन 23 व्या स्थानापर्यंत उंचावले आहे. विद्यापीठाने विविध पिकांचे वाण, अवजारे व शिफारशींच्या माध्यमातून तसेच शुध्द स्वरुपातील बियाण्यांचा पुरवठा करुन शेतक-यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विद्यापीठाने विकसीत केलेले एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल जास्तीत जास्त शेतकर्यांच्या शेतात राबविण्याचे प्रयत्न चालू आहेत. जेणेकरुन शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे. शेतीचे संपूर्ण यांत्रिकीकरण झाल्याशिवाय शेतक-यांचे उत्पन्न वाढणार नाही. विद्यापीठाने शेतीचे आधुनिकीकरण तसेच यांत्रिकीकरण करण्यासंबंधीच्या संशोधनावर कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातून भर दिला असून ड्रोन, कृत्रिम बुध्दीमत्ता, सेन्सर इ. क्षेत्रात विद्यापीठाचे काम दीपस्तंभासारखे आहे.
( हेही वाचा: यंदाच्या वर्षी राज्यात कर वाढ होणार का? काय म्हणाले अजित पवार? )
कृषि क्षेत्राचे योगदान महत्वाचे
कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातूनच विविध गावात डिजीटल हवामान केंद्रे उभारली आहेत. यासारख्या प्रयत्नातूनच देश आत्मनिर्भर होण्यासाठी कृषि क्षेत्राचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याचे, प्रतिपादन प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक सुखदेव बलमे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके, सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे, एन.सी.सी. अधिकारी डॉ. सुनिल फुलसावंगे, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
Join Our WhatsApp Community