मुंबईतील वांद्रे पूर्व येथील बेहरामपाड्याची ओळख जरी कडवट मुस्लिम वस्ती म्हणून होत असली, तरी याची अजून एक ओळख आहे. ती म्हणजे अनधिकृत बांधकामे आणि झोपड्यांवर इमले चढवत टोलेजंग बांधलेल्या इमारतीवजा झोपडपट्टी. परंतु याठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ मतांवर डोळा ठेवत दुर्लक्ष केले जात असल्याने, मुंबईतील सर्वांत उंच झोपड्यांचा परिसर म्हणून आज बेहरामपाड्याची ओळख आहे. बेहरामपाड्यातील ही लस आता मुंबईतील अनेक झोपडपट्टयांना लागून त्याठिकाणी झोपड्यांवर इमले चढवत उत्तुंग झोपड्या बांधल्या जात आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये या उत्तुंग झोपडपटयांचे बेहरामपाडे तयार होताना दिसत आहे.
आयुक्तांकडून कोणतीही कारवाई नाही
मालाड मालवणी येथे बांधकाम सुरु असलेल्या झोपडीचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बुधवारी वांद्रे पूर्व येथील बेहरामपाड्यातील एक पाच मजली झोपडपट्टीचे बांधकाम कोसळून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले आहेत. मात्र, त्यानंतर अनधिकृत बाधकामांवर कारवाई करण्याची कोणतीही कार्यवाही आयुक्तांकडून केली जात नाही. एका बाजुला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांवर प्रचंड विश्वास आहे, मात्र दुसरीकडे चहल हे मुख्यमंत्र्यांचे आदेश जुमानत नाही,असे चित्र पहायला मिळत आहे.
राजकीय दबावामुळे कारवाई थांबली
मुंबईतील झोपड्यांची उंची ही १४ फुटांपर्यंत वाढवण्यास मान्यता आहे. त्यामुळे महापालिकेचे तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील १४ फुटांवरील सर्व झोपड्या आणि चाळींचे वाढीव बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईतील सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील झोपड्यांचे सर्वे करून नोटीस देत कारवाई केली होती. त्यानुसार मुंबईतील वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा येथील झोपडपट्यांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई हाती घेतली. ऑक्टोबर २०१६ मध्ये तत्कालिन एच पूर्वचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेत येथील बांधकामे तोडण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी दोन ते पाच मजल्यांपर्यंत वाढवलेल्या काही कुटुंबांनी स्वत:हून बांधकामे तोडून दिली होती. त्यामुळे महापालिकेला याठिकाणी पोलीस बळाचा वापर करून ही बांधकामे तोडावी लागली नव्हती. परंतु पुढे राजकीय दबावापोटी ही कारवाईच वांद्र्यासह सर्व विभागांमध्ये थांबली गेली आणि पुन्हा एकदा उंचच उंच झोपड्या दिसून आल्या आहेत.
शिवसेनाच पाठीशी घालतेय
बेहराम पाडा परिसरात यापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक निवडून यायचे. परंतु आता याठिकाणी शिवसेनेचे हालिम शेख हे निवडून आले आहे. परंतु येथील वाढत्या झोपडीधारकांना शिवसेनेचेच अधिक पाठबळ असून, येथील चमडावाडी नाल्याच्या बांधकामांमध्ये अपात्र ठरलेल्या कुंटुंबांनाही तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांची पात्रता निश्चित होण्यापेक्षा संक्रमण शिबिरांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता. एकीकडे अपात्र कुटुंबांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात असताना, दुसरीकडे शिवसेनेने येथील अपात्र कुटुंबांना तात्पुरत्या सदनिका वितरीत केल्या होत्या. आगामी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून तत्कालिन महापौरांनी हे तात्पुरते पुनर्वसन केले होते.
( हेही वाचा :चेंबूरमधील ‘या’ भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटणार )
अनधिकृत बांधकामे अधिकृत दाखवण्याचा प्रयत्न
मुंबईत सध्या वांद्र्यात बेहरामपाडा,भारत नगर, चिता कॅम्प, माहिम, धारावी, मालाड मालवणी, कुर्ला, विक्रोळी, सांताक्रुझ, कांदिवली, दहिसर आदी भागांमध्ये झोपडपटयांवरील मजले वाढले जात असून, यावर महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. परिणामी झोपड्यांवरील बांधकामे वाढून पाच मजल्यांपर्यंत झोपड्या उंच वाढवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आधीच अनधिकृत बांधकामे त्यातच वाढीव मजल्यांचे बाधकामांवरील जागेवरही हक्क दाखवून तेथे राहणाऱ्या कुटुंबांना पात्र ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Join Our WhatsApp Community