दादर गोखले रोड येथे मागील अनेक वर्षापासून कचराकुंडी बनलेल्या एका जुन्या पाणपोईला आता मुंबई महापालिका साज शृंगार चढवणार आहे. ही पाणपोई अत्यंत पुरातन असून अत्यंत बकाल अवस्थेत असलेल्या या पाणपोईला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. त्यामुळे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असलेली ही पाणपोई भविष्यात अनेक तहानलेल्या वाटसरूंची क्षुधाशांती करणारी ठरणार आहे.
मुंबई शहरास तत्कालिन वास्तुशास्त्रीय, सांस्कृतीक समृद्धीची प्रचिती देणाऱ्या तसेच काही ऐतिहासिक घटनांचे स्मरण देणाऱ्या अशा भव्य वास्तू तथा प्रतिमा यांचे देणे लाभले आहे. मुंबई शहरात तब्बल ३० प्याऊ हे अठरा व एकोणीस शतकातील सामाजिक व सांस्कृतिक ऐतिहासिक वास्तू आहेत. पूर्वी या प्याऊ शहरांमधील वाहन म्हणून वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांचे आणि वाटसरूंची तहान भागविण्याचे साधन होते. हे प्याऊ हे त्यावेळी एखाद्या धर्मादाय संस्था अथवा आश्रमदात्याकडून चालविण्यात येत असत. पण काळानुसार या प्याऊचा वापर कमी होऊ लागला आणि या वास्तू पडिक बनल्या. पुढे या वास्तूच्या पडिक जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी किंवा दुर्लक्षित वास्तू म्हणून भिकाऱ्यांना सामान ठेवण्याची जागा म्हणून याचा वापर होत गेला. परंतु या पुरातन वास्तू म्हणजे लोकांसाठी एकप्रकारे अडगळ बनली होती. परंतु हे प्याऊ हे पुरातन वास्तू श्रेणी ३मध्ये मोडत असल्याने त्याचे जतन व संवर्धन महापालिकेच्यावतीने केले जात आहे.
दादर पश्चिम येथील गोखले रोडवर आशिष इंडस्ट्रिजसमोर अशाचप्रकारे एक दुर्लक्षित प्याऊ ची वास्तू पडली होती. आनंद विठठल कोळी प्याऊ नावाची वास्तू आहे. हे प्याऊ इंडो-सारसेनिक पोरबंदर दगडात कोरलेला घुमट, नाजुक कळस व अतिसुक्ष्म फुलांची आकृतीबंध इत्यादी घटकांनी बनलेली सुंदर वास्तू आहे. प्याऊंचा शास्त्रोक्त पद्धतीने जीर्णोद्धार करून प्याऊंची मूळत: नक्षीदार असलेली संरचना पूर्ववत करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. महापालिका पुरातन वास्तू वारसा विभागाच्यावतीने हे काम केले जात असून स्थानिक शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी या प्याऊचा जिर्णोध्दार केला जावा म्हणून प्रयत्न केला आहे.
पुरातन वास्तूंच्या जतनासाठी अधिनियम
या वारसा वास्तुंचे काळजीपूर्वक संरक्षण तथा परिरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत नियम ५२ सुधारीत करून ‘वारसा वास्तू जतन करण्याच्यादृष्टीने अधिनियम बनवले आहे. ज्यामध्ये अशा प्रकारच्या सर्व वारसा वास्तू अभिज्ञात, सुचीबद्ध आणि संरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यांचे तीन मुख्य श्रेणीमध्ये म्हणजे श्रेणी १, श्रेणी २ आणि श्रेणी ३ मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
(हेही वाचा – तब्बल 69 वर्षांनंतर एअर इंडिया ‘टाटा’ समूहाकडे परतणार…काय आहे कारण?)
प्याऊचे कशाप्रकारे केले जाणार आहे काम
- प्याऊच्या वास्तूची व्यापक साफसफाई दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे.
- पुरातन वास्तूचे तुटलेले भाग त्याच दगड प्रकाराचे नवीन बनवून बसवले जाणार.
- प्याऊची जलव्यवस्था पुर्नस्थापित करून टाकीमधून पाणी फिल्टर करून उपलब्ध करून दिले जाणार
- ऐतिहासिक प्याऊच्या माहितीचा फलक लावून आकर्षक दिवाबत्ती केली जाणार
- प्याऊच्या परिसरात बसण्यासाठी बेंचची व्यवस्था केली जाणार
- आजुबाजूच्या परिसराचे सुशोभिकरण केले जाणार
- प्याऊच्या मागील कंपाऊंड भिंतीवर मुंबईतील प्याऊ व त्यांचा इतिहास दर्शविणारे भित्तीचित्र निर्माण केले जाणार
- प्याऊचे जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ वर्ष प्याऊचे परिरक्षण व जतन केले जाणार