मालाडमधील एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव दिल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाद सुरू आहे. त्यामुळे विरोधकांकडून टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील क्रीडा संकुलाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झाल्याने अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपकडून या उद्यानाच्या नावावरून मुद्दा तापवला जात असताना आता शिवसेनेनेही भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. राजीनामा हवा असेल तर भाजप टिपू सुलतानचे गुणगान करणाऱ्या राष्ट्रपतींचा घेणार का, असा सवाल शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले राऊत
पहिल्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल, जर भाजपची ही भाषा असेल ते आम्ही बघू. टिपू सुलतानचं काय करायचं हे सरकार पाहिल. कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलातानाचा रामनाथ कोविंद यांनी गौरव केला. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक अशा उपाध्या राष्ट्रपती यांनी दिल्या. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रपतींचा राजीनामा मागणार का? आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही (भाजप) इतिहासाचे ठेकेदार नाही, आम्हाला माहीत आहे टिपू सुलतान यांनी काय केलं, कसे अत्याचार केले, काय अन्याय केला, कसे ब्रिटिशांच्या विरोधात लढले, हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले.
सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही
पुढे राऊत म्हणाले की, ‘आम्ही टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगम पटण्णम, म्हैसुर राज्य या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. टिपू सुलतानाने काय केलं?, कसे अत्याचार केला?, काय अन्याय केला? किंवा ब्रिटांशासोबत कसा लढा दिला? हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही. पण महाराष्ट्रभर आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू, ही जर भाषा तुमच्या तोंडात असेल, तर या पेटवापेटवीमधले तज्ज्ञ महाराष्ट्रात कोण आहेत, हे सगळ्यांना माहित आहेत. पण आम्ही करत नाही. राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिल्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा मागणार आहात का?’
(हेही वाचा -सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन )
मुंबईतील मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. बुधवारी या उद्यानाच्या उद्घाटनाआधी भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
Join Our WhatsApp Community