दिव्यांगधारा प्रतिष्ठान आणि क्रीडा भारतीच्या सौजन्याने पथदर्शिका २०२२, ‘विशुद्ध पालकत्व, विजयपथ का निर्माण, निरंतर गाए राष्ट्रगान’ या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच लोअर परेल येथील यशवंत भवन, सभागृहात झाला. यावेळी अखिल भारतीय संपर्क गटाचे ज्येष्ठ प्रचारक रविकुमार अय्यर यांच्या हस्ते टेबल दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. ही दिनदर्शिका अनिकेत बुधारप, किशोर गुप्ता आणि हरीष यादव या तीन कर्णबधिर युवकांच्या कौशल्यांच्या प्राविण्यातून निर्माण झाली आहे.
( हेही वाचा : बूस्टर डोस प्रभावी आहे की नाही? तज्ज्ञांच्या मनात शंका! )
पॅरालिम्पिक २०२० यामधील १७ खेळाडूंचा संघर्ष
पॅरालिम्पिक २०२० यामधील १७ खेळाडूंचा संघर्ष आणि यशाच्या कथा या पथदर्शिकेत वाचायला मिळणार आहेत. क्रीडा विषयातील अन्य पुरस्कारांच्या माहितीही या दिनदर्शिकेत आहे. शालेय क्रीडा पाठयक्रमात एक पाठ्यपुस्तक म्हणून क्रीडाशिक्षकांना तसेच मूल्यशिक्षण, सामान्य ज्ञानासाठी एक वाचनीय पुस्तक म्हणून या दिनदर्शिकेचा उपयोग होणार आहे.
या कार्यक्रमाचा उद्दात्त हेतू हा आहे की, दिव्यांगांच्या क्षमतांना राष्ट्रीय स्तरावरील काम करणाऱ्या संस्थांनी योग्य मान, मोबदला आणि मान्यता मिळवून देणे, या युवांचे पालकत्व स्वीकारावे, जेणेकरून दिव्यांग युवा आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी होईल. त्यांचे मानसिक आरोग्य क्रीडा व कलेने समृद्ध होईल, असे मानसशास्त्रज्ञ शिवांगी वालावलकर यांनी कार्यक्रमात सांगितले.
या टेबल कॅलेन्डरचे देणगीमूल्य १०० रुपये असून विद्यार्थ्यांसाठी ८० रु आहे. अधिक माहितीसाठी ९८७०००४१३४ किंवा ९८७०४४४१३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
मान्यवरांचा गौरव
या दिनदर्शिकेची संकल्पना आणि लेखन चेंबूर येथील रोचिराम टी. थदानी हायस्कूल फॉर हिअरिंग हॅन्डीकॅप्ड या शाळेच्या निवृत्त उपमुख्याध्यापिका शुभदा ओक-सातपुते यांनी केले आहे. लायन्स क्लब घाटकोपर गॅलॅक्सी आणि अॅड. वीरेंद्र तुळजापूरकर यांच्याकडून आर्थिक सहभाग लाभले तर, प्रिंट प्लस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या सौजन्याने दिनदर्शिकेचा प्रिंटिंगचे काम सुलभ होण्यास मदत झाली.
( हेही वाचा : जवानांनी 15 हजार फुटांवर फडकवला तिरंगा )
क्रीडा भारती, मुंबईच्या वतीने कुमार अजय लालवानी या समर्थ व्यायाम मंदिर – शिवाजी पार्क व्यायामशाळेचे दिव्यांग खेळाडू (ज्युडो, स्वीमिंग, सायकलिंग, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, वॉटरफॉल, रॅपलिंग, मल्लखांब, चेस) यांच्या मातोश्रीस वीर जिजामाता पुरस्कार देऊन, जिजामाता जयंती दिनी गौरविण्यात आले.
संस्कारभारती कोकणप्रांत यांच्या वतीने दिनदर्शिकेची निर्मिती करणाऱ्या तीन कर्णबधिर युवा कलाकारांच्या मातांना, कुटुंबियांना वीर जिजामाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हरीष आणि कर्णबधीर कलाकार रीती अग्रवाल यांनी तयार केलेले कलासाहित्य व पोट्रेट देऊन मान्यवरांना गौरविण्यात आले.
Join Our WhatsApp Community