कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच राज्यातील मंत्र्यांना कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. मागील महिनाभरापूर्वीच राज्यातील २० मंत्री आणि ४० हुन अधिक आमदार कोरोनाबाधित झाले होते, मात्र मंत्र्यांना कोरोनाची लागण होणे अजूनही थांबले नाही. कारण काँग्रेसचे नेते, मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती तेव्हा समोर आली जेव्हा मंत्री चव्हाण हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे.
पणजीत प्रचाराला जाणार होते
गेली चार दिवस अशोक चव्हाण नांदेडमध्ये होते, यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे भुमिपुजन, उद्घाटन केले. प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकावला, त्यानंतर ते दुपारी मुंबईला रवाना झाले. त्यांना गुरूवारी रात्री गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पणजी येथे जायचे होते. मात्र अंगात किंचित ताप वाटल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. दरम्यान ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. आपला अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे कळताच ते या बैठकीतून बाहेर पडले. मात्र त्यांना काेणताही त्रास जाणवत नसल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही खबरदारी म्हणून काेराेना चाचणी केली जात आहे.
(हेही वाचा वाझेची फाइलही मंत्रालयातच चाळली! किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट)
आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच काेराेना चाचणी करून घ्यावी, आराेग्याची काळजी घ्यावी व काेराेना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 24 जानेवारीला त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः पवार यांनी दिली. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. राज्यातल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागणगेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली होती.
Join Our WhatsApp Community