मिरा-भाईंदर महापालिकेतील एक कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार उघड

128

महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणा-या खर्चासाठी आगाऊ रकमा दिल्या जातात. ज्याला ‘तसलमात’ असे म्हटले जाते. या ‘तसलमात’ प्रकरणी मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून गैरव्यवहार झाला असून 1 कोटी 24 लाखाहून अधिक रक्कम महानगरपालिकेकडे जमा न झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी सर्वसामान्य जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशाचा दुरुपयोग केला आहे. या ‘तसलमात’ प्रकरणी महापालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, तसेच या प्रकरणात गैरव्यवहार करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. महानगरपालिकेतील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास, वेळ पडली तर फौजदारी कारवाई करण्यासह आम्ही जनआंदोलनही उभारू, अशा इशारा हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’चे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी दिला.

‘सुराज्य अभियाना’च्या वतीने भाईंदर (प) येथील कै.ह.ना.गोखले सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल आणि ‘लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा स्वाती पाटील या उपस्थित होत्या.

(हेही वाचा विकासकामांचे उद्घाटन केले, ध्वज फडकावला, मंत्रिमंडळ बैठकीत आले आणि कोरोना पॉझिटिव्ह निघाले!)

‘तसलमात’मध्ये भ्रष्टाचार 

‘सुराज्य अभियान’चे समन्वयक डॉ. उदय धुरी पुढे म्हणाले की, ‘महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेतल्यानंतर रकमेचा विनियोग काय झाला, त्याचा तपशील आणि पुरावे उदा. देयके जमा करणे आणि उरलेली रक्कम वेळच्या वेळी जमा करणे कायद्याने बंधनकारक असते. आधीच्या ‘तसलमात’चा हिशोब जमा केल्याशिवाय नवीन आगाऊ रक्कम उचलता येत नाही, असा कायदा असूनही मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेणारे काही कर्मचारी आणि अधिकारी यांनी कित्येक वर्षे ना हिशोब दिला आहे, ना रकमा जमा केल्या आहेत. ‘तसलमात’ अंतर्गत पालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी वर्ष 1993 पासूनच्या हजारो रुपयांच्या रकमा यात प्रलंबित आहेत. खरेतर साधारणत: वर्ष 2020 पासूनच विविध व्यक्तींना दिलेल्या रकमांची वसुली करणे सुरू झाले आहे, असे निर्दशनास आले आहे. एकूण 1 कोटी 50 लाख याहून अधिक रक्कम विविध कर्मचा-यांना आतापर्यंत दिली गेली, मात्र आतापर्यंत फक्त जेमतेम 25 लाख 38 हजार 600 रूपये एवढीच वसुली संबंधित कर्मचा-याकडून केली केली. ही वसुली अत्यंत किरकोळ आहे. तसेच आधीच्या वसुलीबाबत काहीही करण्यात आलेले नाही. या संदर्भात 31 मार्च 2021 पर्यंत सदर रक्कम 1 कोटी 24 लाख 85 हजार 808 रुपये इतकी प्रचंड असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे.’

आयुुक्तांची कार्यशैली संशयास्पद

‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल म्हणाले, ‘मिरा-भाईंदर महानगरपालिका अनेक गोष्टींसाठी लोकांकडून कर वसूल करते, मात्र त्यांच्याच कर्मचा-यांकडून आगाऊ दिलेल्या रकमांची वसुली करण्यात उदासीनता दाखवते, ही गंभीर बाब आहे. वर्ष 1993 पासून एवढ्या मोठ्या प्रमाणात तत्कालीन आणि विद्यमान आयुक्तांनी विविध कर्मचार्यांकडून वसुली केलेली नाही. यावरून आयुुक्तांची कार्यशैली संशयास्पद हे स्पष्ट होत आहे. आयुक्तांनी या दोषी कर्मचार्यांकडून व्याजासहीत वसुली करवून घ्यावी, अशी आमची मागणी आहे. ‘लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा स्वाती पाटील म्हणाल्या, ‘मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचा-यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. राज्यात इतर अनेक महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जनतेनेच या भ्रष्टाचाराविरोधी लढ्यात पुढाकार घ्यावा.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.