वडाळ्यात शिवसेना विरुद्ध कोळंबकर यांच्यातच होणार लढत

183

मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीत मैदान मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आता वडाळा विधानसभेत काँटे की टक्कर होणार आहे. एकेकाळी शिवसेनेचा गड असलेल्या या विधानसभेमध्ये विद्यमान महापालिकेत शिवसेनेला केवळ दोनच नगरसेवक निवडून आणता आले होते. परंतु त्यातुलनेत काँग्रेसचे तीन नगरसेवक झाले होते. अर्थात काँग्रेसचे हे तीन नगरसेवक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर वाढले होते, त्यामुळे यंदा कालिदास कोळंबकर हे भाजपकडे असल्याने वडाळ्यात कोळंबकर विरोधात शिवसेना असे चित्र पहायला मिळणार आहे.

( हेही वाचा : त्यावर क्रीडांगणाचे आरक्षणच नाही, ती जागा तर सांडपाणी प्रकल्पाची : भाजपने केला भांडाफोड)

वडाळा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे अमेय घोले आणि उर्मिला पांचाळ हे दोन नगसेवक असून भाजपच्या नेहल शाह या एकमेव नगरसेविका आहेत. तर काँग्रेसच्या सुप्रिया सुनील मोरे, पुष्पा कोळी आणि सुफियान वणू हे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत. या मतदार संघात कालिदास कोळंबकर यांचा पहिल्यापासून प्रभाव राहिला असून मागील २०१२च्या निवडणुकीत या मतदार संघात काँग्रेसचे नयना शेठ, सुनील मोरे आणि पल्लवी मुणगेकर हे तीन नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे अलका डोके व तृष्णा विश्वासराव या निवडून आले होते, आणि मनोज संसारे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.

शिवसेना विरुध्द आमदार कालिदास कोळंबकर

परंतु सन २०१७च्या निवडणुकीत नेहल शाह यांच्या रुपाने भाजपने या मतदार संघात खाते उघडले आहे, तर प्रभाग १७८मध्ये अमेय घोले यांना अवघ्या ८५ ते ९० मतांनी विजय झाला होता. नवख्या जेसल पटेल यांनी शिवसेनेच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे भाजपला याठिकाणी निसटता पराभव पत्करावा लागला होता, तर दुसरीकडे माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांना प्रभाग क्रमांक १७९मध्ये निसटता पराभव पत्कारावा लागला होता. विद्यमान काँग्रेसचे नगरसेवक नियाज वणू यांचा केवळ १२७ मतांनी पराभव झाला होता.

( हेही वाचा : टिपू सुलतानच्या नावाची पाटी काढायला पालकमंत्र्यांना कोणी रोखले? )

या मतदार संघात भाजपची ताकद नसली तरी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागात भाजपची ताकद दिसून आली होती. विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांना भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी घाम फोडला होता. परंतु आता भाजपची ताकद कोळंबकर यांच्या प्रवेशामुळे अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपल्या दोन जागा कायम राखण्यासाठी आधी प्रयत्न करावे लागणार आहे, तर कोळंबकर यांना भाजपची संख्या एक वरून अधिक वाढवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजप विरुध्द शिवसेना या चित्राबरोबरच शिवसेना विरुध्द आमदार कालिदास कोळंबकर हे चित्र निर्माण झालेले पहायला मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.