ठाकरे सरकराने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी राज्याला मद्य महाराष्ट्र बनवणार आहात का, असा सवाल भाजपने केला. दरम्यान, भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
राऊतांनी असा निर्णय घेण्याचे सांगितले कारण
ठाकरे सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं. वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
(हेही वाचा – ठाकरे सरकारला झटका! भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय)
विरोधकांनी उगाच लेबल लावू नये
महाराष्ट्राला एक परंपरा आहे. महाराष्ट्राने काय बनावं. यासाठी मुख्यमंत्र्यासह ठाकरे सरकर, महाविकास आघाडीचे नेते समर्थ आहेत. त्यांना सरकार चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे उगाच विरोधकांनी लेबल लावू नये असे संजय राऊत म्हणाले. तर विरोधकांवर टीका करताना राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे.