मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागातील दवा बाजारासह गिरगावमधील अनेक भागांतील फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत येथील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात आले आहेत. येथील ९२ अनधिकृत फेरीवाल्यांवर ही कारवाई महापालिकेच्या पथकामार्फत करण्यात आली आहे.
फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्ते व्यापल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध परिसरातील फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.
‘सी’ विभागातील दवा बाजार परिसरात घाऊक बाजारपेठा, अनेक आस्थापनांची कार्यालये असल्याने या भागात कायम रहदारी व वर्दळ असते. या भागात फेरीवाल्यांसह हातगाड्याही रस्ते अडवून उभ्या केल्या होत्या. याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’नेही महापालिकेचे लक्ष वेधून घेतले होते. येथील पदपथावर विशिष्ट समाजाचे लोक संसार थाटून बसली होती, त्यामुळे चांगल्या बनवलेल्या पदपथांचा वापर पादचाऱ्यांना करता येत नव्हता.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित! )
सर्व रस्ते फेरीवालेमुक्त
वाढत्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जगन्नाथ शंकरशेट मार्ग, पांजरापोळ, तीन बत्ती नाका, पाचवा कुंभारवाडा, मोती सिनेमा, दादीशेठ अग्यारी लेन, भूलेश्वर मार्ग, दवाबाजार, आत्माराम मर्चंट मार्ग, शेख मेमन मार्ग आदी परिसरांमध्ये ही कारवाई करुन सर्व रस्ते फेरीवालेमुक्त करण्यात आले.
( हेही वाचा : क्या बात है! पहिल्यांदाच कोकण रेल्वे धावली इलेक्ट्रिक इंजिनवर… )
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सर्व संजय गोसावी तसेच तानाजी मोरे, निरीक्षक भय्यासाहेब पारधी, अमोल महाजन, जगदीश झोरे आणि रतिलाल जाधव यांच्यासह २४ कामगार तसेच पोलीसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community