मुंबईतून चोरी केलेले ८ कोटींचे दागिने पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून चोरांनी शक्कल लढवून चोरलेल्या दागिन्यांपैकी ४ कोटींचे दागिने एकाच्या शेतात पुरून ठेवल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी राजस्थान आणि मध्य प्रदेश येथून मुख्य चोरासह १० जणांना अटक करून शेतात पुरलेल्या दागिन्यांसह ७ कोटी १२ लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहे.
दागिने चोरी करून राजस्थान येथे पोबारा
मुंबईतील भुलेश्वर या ठिकाणी असलेल्या एका कार्यालयातील तिजोरी ठेवण्यात आलेले ८ कोटी ११ लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड, असा सव्वा आठ कोटी रुपयांचा ऐवज १३ जानेवारी रोजी चोरीला गेला होता. ताडदेव येथे राहणाऱ्या व्यावसायिकाने याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या व्यावसायिकाने हे दागिने गोरेगाव येथील त्यांच्या कार्यालयातून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या प्रदर्शनात मांडण्यासाठी आणून ठेवले होते. परंतु कोविडमुळे प्रदर्शन रद्द झाल्यामुळे हे दागिने त्याने भुलेश्वर येथे असणाऱ्या कार्यालयात तिजोरीत ठेवले होते. या व्यावसायिकांचा ६ महिन्यापूर्वीच कामाला लागलेला नोकर गणेश देवाशी (२१) याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे दागिने चोरी करून राजस्थान येथे पोबारा केल्याची तक्रार व्यावसायिकाने केली होती. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी ८ विविध पथके तयार केली होती. पोलिसांनी आरोपींचा माग काढत इंदोर आणि राजस्थान येथून तिघांना अटक करण्यात आली. या तिघांच्या चौकशीत गणेश देवाशी याने पोलिसांना दिलेल्या माहितीत चोरीच्या दागिन्यांपैकी ४ कोटींचे दागिने रमेश प्रजापती याच्या शेतात पुरले असून उर्वरित दागिने गावातील मित्र आणि नातेवाईकांकडे लपवून ठेवले असल्याचे सांगितले.
(हेही वाचा प्रवाशांनो, लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक!)
४ कोटी रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले
पोलीस पथकाने याप्रकरणी आणखी सात जणांना राजस्थानमधून अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले, तसेच रमेश प्रजापती याच्या शेतात जाऊन दागिन्यांचा शोध घेण्यात आला असता एका ठिकाणी जमिनीत पुरलेले ४ कोटी रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याची माहिती मुख्य आरोपींना मिळाली होती. पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर चोरीचा माल देखील जप्त करतील, परंतु पोलिसांनी आपल्याला अटक केली तरी चालेल, मात्र दागिने पोलिसांच्या हाती लागले नाही पाहिजे, या उद्देशातून गणेश देवाशी आणि इतरांनी हे दागिने ठेवण्यासाठी गावातील काही जणांना या गुन्ह्यात सामील करून घ्यावे लागले, या अनुषंगाने त्यांनी ४ कोटींचे दागिने शेतात पुरले आणि इतर ऐवज गावातील नातलग आणि मित्र यांच्याकडे थोडे थोडे ठेवायला दिले होते, अशी माहिती आरोपींच्या चौकशीत पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पथकाने याप्रकरणी १० जणांना अटक करून ७ कोटी ११ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले असून दोन जण अद्याप फरार असून शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community