मुंबईतील फुटपाथवर शेकडो जणांचे संसार थाटलेले असतात, तिथेच त्यांची संसार फुलतात. असेच एक दाम्पत्य सायन रुग्णालयाच्या मागील फुटपाथवर राहत होते, विवाहाला जेमतेम वर्ष उलटलेल्या या दाम्पत्याने मुलीला जन्म दिला. मात्र ४५ दिवसांच्या या मुलीचे अपहरण झाले आणि पुढे तिची हत्या करण्यात आली. रस्त्यावर राहणाऱ्या या गरीब दाम्पत्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार तपास अधिकारी विजय खैरे यांनी केला. ऑगस्ट २०१४च्या घटनेत गजाआड केलेला आरोपी असगरली मतीनुर रेहमान शेख वय ५१ वर्ष याला २८ जानेवारी २०२२ रोजी सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली.
नवं दाम्पत्यावर झाला अन्याय…
या प्रकरणातील तेव्हाचे तपास अधिकारी विजय खैरे जे सायबर गुन्हे शाखेचे उप अधीक्षक म्हणून निवृ्त्त झाले आहेत, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर आपण एका गरीब दाम्पत्याला न्याय मिळवून दिला याचे समाधान व्यक्त केले. ‘आजचा दिवस हा माझ्यासाठी एक आव्हान संपुष्टात आणणारा आहे. 34 वर्षे पोलिस सेवेत अनेक लहान मुले, वरिष्ठ नागरिक (महिला व पुरुष) यांच्या खुनांच्या गुन्ह्यांची उकल केली, पण ज्या खुनाच्या गुन्ह्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, तो २०१४ सालातील सायन फुटपाथवरील ४५ दिवसांच्या मुलीच्या हत्येच्या गुन्ह्याने. या ठिकाणी वर्ष-दीड वर्ष विवाहाला झालेले दाम्पत्य राहत होते, त्यांना ४५ दिवसांची मुलगी होती, तसेच मुलाची आईदेखील त्यांच्यासोबत राहत होती. दिवस-रात्र हे कुटुंब फुटपाथवरच राहायचे. पहाटे ४ वाजता पती-पत्नी दोघे कचरा गोळा करण्यासाठी जायचे, त्या दरम्यान त्या दाम्पत्याची मुलगी मुलाची वयस्क आई सांभाळायची.
(हेही वाचा श्रीमलंग गडाच्या बाजूचा पहाडेश्वर पर्वतही मुसलमानांच्या ताब्यात! वन विभागाची भूमिका संशयास्पद)
४५ दिवसांच्या बाळाला केलेले ठार
एक दिवस मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात आली. दोन दिवसांनी सायन पुलाखाली एका लहान बाळाचा मृतदेह सापडला, आरोपीने त्या मुलीला ठार केले होते, बाळाच्या मृतदेहाची ओळख पटल्यावर आपण मनोमन या मागील गुन्हेगाराला शोधून त्याला गजाआड करण्याचा निर्धार केला. त्याप्रमाणे सर्वत्र शोध सुरु केला, सीसीटीव्ही तपासून आम्ही आरोपीचा शोध काढला, तेथील एका सार्वजनिक शौचालयात संबंधित आरोपी नियमित येत असल्याचे समजले. त्यानुसार त्यासाठी फिल्डिंग लावली. एक दिवस शौचालयवाल्याचा फोन आला, त्याने आरोपी आला आहे, असे सांगितले. मी ताबडतोब माझ्या सहकाऱ्याला तिथे जाण्यास सांगितले आणि मीही निघालो. तोवर आरोपीला सहकार्याने पकडून ठेवले होते. त्यानंतर मी या सर्व प्रकरणाचे इत्यंभूत पुरावे जमा करून न्यायालयात मांडले. त्याचा परिणाम म्हणून आरोपी असगरली मतीनुर रेहमान शेख याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
एकतर्फी प्रेमामुळे केला खून
या प्रकरणातील आरोपीला पकडल्यावर आरोपीचा गुन्ह्यामागील उद्देश ऐकून आणखी संताप आला. कारण आरोपी असगरली मतीनुर रेहमान शेख याला लहान मुलीची आई आवडत होती, तो तिला धमकावयाचा, तिला नाही, तर तिच्या मुलीला ठार करेन, अशी धमकी द्यायचा, एकतर्फी प्रेमामुळेच त्याने ४५ दिवसांच्या मुलीला ठार केले. यामध्ये त्या लहान बाळाचा काय दोष होता? म्हणूनच आपण निश्चयाने या गुन्ह्याचा माग काढला, असे निवृत्त पोलीस अधिकारी अधिकारी विजय खैरे म्हणाले.
(हेही वाचा एडीआर अहवाल: भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, तर काॅंग्रेसचे देणे बाकी आणि जाणून घ्या शिवसेना कुठे?)
Join Our WhatsApp Community